पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध विकास कामांचं उद्घाटन करण्यासाठी मुंबईत आले. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर मुंबई मेट्रोतूनही प्रवास केला. या प्रवासातील तिघांचा एक फोटो चर्चेचा विषय ठरला. हाच फोटो ट्वीट करत स्वतः देवेंद्र फडणवीसांनीही आम्ही काय बोलत असू याचा अंदाज बांधण्यास सांगितलं. याबाबत आता खुद्द एकनाथ शिंदेंनाच विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. ते मंगळवारी (२४ जानेवारी) एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
एकनाथ शिंदे म्हणाले, “खरं म्हणजे हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोठेपणा आहे. कारण ते देशाचं नेतृत्व करतात, जगभरात त्यांचं नावलौकिक आहे. कोण एकनाथ शिंदे, तर मी त्यांच्यासाठी केवळ एका राज्याचा मुख्यमंत्री आहे. असं असलं तरी त्यांना काम करणारे लोक आवडतात. धडाधड निर्णय घेणारे धाडसी लोक आवडतात, असं असू शकतं.”
“मोदी चांगलं काम करणाऱ्यांच्या पाठीवर शाबसकीची थाप देतात”
“आमचं चांगलं काम सुरू आहे. त्यामुळे त्यांना ते आवडत असेल. चांगलं काम करणाऱ्यांच्या पाठीवर शाबसकीची थाप देण्याचं ते काम करत आहेत. त्यांनी नागपूर-मुंबई समृद्धी प्रकल्पाचीही माहिती घेतली. किती लोकांना त्याचा फायदा होणार आहे. या प्रकल्पामुळे लाखो लोकांचा फायदा होणार आहे. तेव्हा काही लोक या प्रकल्पाला विरोध करत होते. मात्र, आम्ही एकदम भिडून काम केलं,” असं मत एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलं.
हेही वाचा : “प्रकाश आंबेडकर सातत्याने अकोल्यातून निवडणूक हरले, आता त्यांना…”, फडणवीसांनी सांगितलं युतीचं कारण
व्हिडीओ पाहा :
“फडणवीसांनी स्वप्न पाहिलं आणि त्याची पूर्तता मी केली”
“तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी ते स्वप्न पाहिलं आणि त्याची पूर्तता मी केली. मोदींनी मेट्रोचंही लोकार्पण केलं. किती लाख लोकांना याचा फायदा होणार ही सर्व माहिती त्यांच्याकडे असते. आम्ही चांगलं काम करतो आहे. त्यामुळे त्यांना ते आवडत असावं. तो त्यांचा मोठेपणा आहे,” असंही एकनाथ शिंदेंनी नमूद केलं.
हेही वाचा : Photos : “शिवसेनेचा आरक्षणाला-मराठवाडा विद्यापीठ नामांतराला विरोध, त्यामुळे आता…”, फडणवीसांचं मोठं विधान
“मला माझ्या आणि मोदींमधील मेट्रोची चर्चा गुपितच ठेवायची आहे”
पुन्हा एकदा खोदून मेट्रोत मोदींबरोबर काय बोलत होता असं विचारलं असता एकनाथ शिंदे म्हणाले, “मी आणि नरेंद्र मोदी मुंबई मेट्रोत एकमेकांना टाळ्या देत हसत का होतो हे गुपित उघड केलं तर गुपित काय राहणार. मला माझ्या आणि मोदींमधील मेट्रोची चर्चा गुपितच ठेवायची आहे.”