ठाकरे गटाचे नेते अमेय घोले यांनी सोमवारी (१७ एप्रिल) रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला. यानंतर एकनाथ शिंदे यांनी या पक्षप्रवेशावर भाष्य केलं. अमेय घोले मोठा पक्षप्रवेश करू असं म्हटले होते, मात्र खारघरमध्ये दुर्दैवाने दुर्घटना घडली. त्यामुळे अतिशय साधेपणाने हा प्रवेश झाला, असं मत एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलं.

एकनाथ शिंदे म्हणाले, “अमेय घोले आणि त्याच्या वार्डातील व मतदारसंघातील सर्व पदाधिकारी-कार्यकर्त्यांचं मी शिवसेनेत मनापासून अभिनंदन करतो, स्वागत करतो. खरं म्हणजे अमेय घोले म्हणाला होता की, आपण मोठा पक्षप्रवेश करू. परंतू खारघरमध्ये आपला मोठा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर दुर्दैवाने दुर्घटना झाली. खरं म्हणजे ते आपल्या परिवारातील सदस्य आहेत. त्यांच्या दुःखात आपण सहभागी आहोत. म्हणूनच अतिशय साधेपणाने अमेय घोले यांचा शिवसेनेत प्रवेश झाला आहे. मी त्याला मनापासून शुभेच्छा देतो.”

“राज्यभरातून हजारो-लाखो कार्यकर्ते शिवसेनेत दाखल होत आहेत”

“आपण बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचं, हिंदुत्वाच्या विचाराचं सरकार स्थापन केलं. त्यानंतर आमदार, खासदार, शिवसेनेचे नेते, उपनेते व अगदी संघटनेचे सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी असे हजारो-लाखो कार्यकर्ते राज्यभरातून आपल्या शिवसेनेत दाखल होत आहेत. याचं कारण गेल्या सात-आठ महिन्यात आपल्या सरकारने लोकांसाठी काम केलं आहे. हे सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आहे,” असं मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं.

“सर्वसामान्यांना सरकारच्या माध्यमातून न्याय मिळू शकतो हा विश्वास”

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, “सरकारने मागील सात-आठ महिन्यात घेतलेले निर्णय बघितले, तर ते लोकांच्या हिताचे आणि सर्वसमावेशक निर्णय आहेत. यात शेतकरी, कष्टकरी, कामगार, तरुण, विद्यार्थी, महिला या सर्वांसाठी निर्णय घेण्याचा धडाका लावला आहे. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी मागील अडीच वर्षात जे प्रकल्प बंद पडले होते त्याला आपण चालना दिली. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना विश्वास निर्माण झाला आहे की, आपल्या लोकांना न्याय द्यायचा असेल, तर सरकारच्या माध्यमातून आपण तो न्याय देऊ शकतो.”

हेही वाचा : विधवा महिलांना ‘गंगा भागिरथी’ म्हणण्यावरून राजकारणाचा पारा चढला, मंत्री लोढांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

“२२७ वॉर्डच्या रचनेच्या सरकारच्या निर्णयावर उच्च न्यायालयाचा शिक्कामोर्तब”

“शिवसेना-भाजपा युतीच्या नव्या सरकारने लोकांना सोयीच्या २२७ वॉर्डची रचना केली. त्यावर उच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केला आहे. हा लोकशाहीचा आणि आपल्या सरकारचा मोठा विजय आहे,” असंही एकनाथ शिंदेंनी नमूद केलं.

Story img Loader