मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रातील राजकारणाचा पारा चढला आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेत केंद्राने मराठा आरक्षणावर निर्णय न घेतल्यास केंद्रात असलेल्या महाराष्ट्रातील मंत्र्यांनी आणि सर्व ४८ खासदारांनी राजीनामे देण्याची मागणी केली. तसेच चिंतामणराव देशमुख यांनी जसा मराठी बाणा दाखवत आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता, तसा महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्र्यांनी मराठी बाणा दाखवावा, असंही म्हटलं. त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. ते मंगळवारी (३१ ऑक्टोबर) मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
एकनाथ शिंदे म्हणाले, “उद्धव ठाकरेंना मराठा आरक्षणावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. कारण मराठा समाजाबद्दल त्यांना किती संवेदना आहेत हे मराठा समाजालाही माहिती आहे आणि आम्हालाही माहिती आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण दिलं. त्याला उच्च न्यायालयात आव्हान मिळालं. मात्र, देवेंद्र फडणवीस आणि आम्ही ते आरक्षण टिकवण्याचं काम केलं. मात्र, ते प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं तेव्हा मुख्यमंत्री कोण होतं, उपसमितीचे प्रमुख कोण होते? यांनी ते मराठा आरक्षण टिकवलं नाही.”
“मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी उद्धव ठाकरे”
“खऱ्या अर्थाने मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी उद्धव ठाकरे आहेत. त्यामुळे त्यांना मराठा आरक्षणावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. मराठा समाजाच्या मोर्चाला, मूक मोर्चाला मुका मोर्चा म्हणून हिणवणारे, महिला-माता भगिनींचा अपमान करणारे कोण होते हेही सकल मराठा समाजाला माहिती आहे. मराठा समाजाचं आरक्षण घालवायला ते जबाबदार आहेत,” असा आरोप एकनाथ शिंदेंनी केला.
हेही वाचा : “महाराष्ट्रातील खासदारांनी एकजूट व्हा, राजीनामे द्या, तरच…”, चिंतामणराव देशमुखांचा उल्लेख करत ठाकरेंचं आवाहन
“आमचं सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध”
“आता ते आरक्षण आम्ही मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यासाठी आम्ही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तसेच न्यायमूर्ती भोसले, शिंदे, गायकवाड समिती तयार केली आहे.आयोगाला युद्धपातळीवर माहिती संकलित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आमचं सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे,” असंही शिंदेंनी नमूद केलं.