पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते आज मुंबईत विविध विकासकामांचे उदघाटन होत असून यानिमित्ताने शिंदे-फडणवीस सरकारने मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगूल वाजविले आहे. आजच्या लोकर्पणाच्या कार्यक्रमात मुख्यमत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करत असताना महाविकास आघाडी आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटावर जोरदार टीका केली. “काही लोकांची इच्छा होती की, हा कार्यक्रम मोदींच्या हस्ते होऊ नये. पण नियतीसमोर कुणाचही चालत नाही. आमची इच्छा होती, महाराष्ट्र आणि मुंबईकरांची इच्छा होती. म्हणूनच लोकार्पण करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज येथे उपस्थित आहेत.”, असे टीकास्त्र एकनाथ शिंदे यांनी सोडले.
पंतप्रधान मोदीजी आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार एकच
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, “मागच्यावर्षीच्या डिसेंबरमध्ये गेमचेंजर अशा समृद्धी महामार्गाचे लोकर्पण मोदी साहेबांच्याहस्ते राज्याच्या उपराजधानीत नागपूर येथे झाले. आज वर्षाच्या पहिल्याच महिन्यात राज्याच्या राजधानीत एक अभुतपूर्व सोहळा संपन्न होतो आहे. वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे जिव्हाळ्याचे नाते होते. हिंदुत्त्व आणि हिंदुत्त्वाचा अभिमान या दोहोंच्या विचारांचा पाया होता. पंतप्रधान यांचे मुंबईकरांच्यावतीने स्वागत करतो. ते आमच्या निमंत्रणाचा मान ठेवून आले याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो.”
हे ही वाचा >> VIDEO: “काही लोकांनी बेईमानी केली, त्यामुळे…”, फडणवीसांचं मोदींसमोर शिवसेनेतील बंडखोरीवर भाष्य, म्हणाले…
पंतप्रधानांना पाहून ऊर्जा मिळते
मविआ सरकारच्या काळात राज्याचा किती विकास झाला? हे सर्वांनाच माहीत आहे. ठप्प झालेल्या कामांना चालना देण्यासाठी, लोकोपयोगी कामांना गती देण्यासाठी आणि ट्राफिकमध्ये गुदमरलेल्या मुंबईकरांची सुटका करण्याची संधी आम्हाला मोदी साहेबांच्या नेतृत्वामुळेच मिळाली. मी जेव्हा मोदींना पाहतो, त्यांची भेट घेतो. तेव्हा माझ्या मनात एक पवित्र भावना निर्माण होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात काहीतरी आहे, जे आम्हाला ऊर्जा देतं. आजच्या दिवसाची सुरुवात सुवर्ण अक्षरात नोंद करावी, अशीच आहे.
दुकानं बंद होणार असल्यामुळेच त्यांच्या पोटात दुखतंय
मुंबईत ४०० किमींचे काँक्रिटचे रस्ते आम्ही तयार करत आहोत. त्याचेही भूमिपूजन आज मोदीजी करणार आहेत. आम्ही रस्ते बांधतोय त्यामुळे इतरांच्या पोटात दुखायला लागले आहे. पुढच्या दोन अडीच वर्षात संपूर्ण मुंबई खड्डेमुक्त होईल. लोकांचे जीवन सुसह्य होईल. यात काही लोक खोडा घालण्याचे काम करत आहेत. त्यांना त्यांचे काम करुद्या आम्ही मुंबईला खड्डेमुक्त करु. दरवर्षी जे खड्ड्यातून प्रवास करतायत आणि जे लोक खड्ड्यातून कमविण्याचे काम करत होते, त्यांनाच हे काम नको होते. डांबरीकरणाच्या नावाखाली काळं-पाढंरं करणाऱ्यांची दुकाने बंद होणार आहेत, हे विरोधकांचे दुःख आहे.