मुंबई : मुंबादेवी, महालक्ष्मी मंदिर परिसर विकासासाठी २८० कोटी रुपये, तर जगन्नाथ शंकरशेट स्मारकासाठी ३५ कोटींचा निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी केली. मुंबादेवी मंदिर, महालक्ष्मी मंदिर, हाजी अली दर्गा, जगन्नाथ शंकरशेट स्मारक व भागोजीशेठ कीर स्मारकाबाबत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या वेळी महालक्ष्मी मंदिर परिसर विकासासाठी मुंबई महापालिकेने ६० कोटी रुपयांचा निधी देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले, तर मुंबादेवी मंदिर सौंदर्यीकरणासाठी २२० कोटी, जगन्नाथ शंकरशेट स्मारकासाठी ३५ कोटी, तर भागोजीशेठ कीर स्मारकासाठी २० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, असा निर्णय घेण्यात आला.
हेही वाचा >>> जगात भारी ‘मुंबईचा वडापाव’; जगप्रसिद्ध सँडविचच्या यादीत मिळाले ‘हे’ स्थान
महालक्ष्मी, मुंबादेवी, हाजी अली प्राचीन देवस्थान आहेत. त्यांच्या सौंदर्यीकरणासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देतानाच भाविकांना सुलभ दर्शनासाठी सोयीसुविधा करण्यात याव्यात. महालक्ष्मी, मुंबादेवी मंदिराचा विकास करताना परिसरातील मंदिरांचेही सौंदर्यीकरण करावे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मंदिर परिसरात वाहनतळाची सोय करताना स्वच्छतागृहांचीही व्यवस्था करावी. मंदिरांचे सौंदर्यीकरण करतानाच प्राचीन स्थापत्य शैलीचाही वापर करण्याच्या सूचना त्यांनी केली. यावेळी महालक्ष्मी मंदिर, मुंबादेवी मंदिर, हाजी अली दर्गा, जगन्नाथ शंकरशेट स्मारक व भागोजीशेठ कीर स्मारकाच्या कामांचे सादरीकरण केले. जगन्नाथ शंकरशेट स्मारक वडाळा येथे करण्यात येत आहे. मुंबई पालिकेने तातडीने ३५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून स्मारकाचे काम वर्षभरात पूर्ण करावे, असे आदेशही शिंदे यांनी महापालिकेला दिले.