मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाची ५३११ घरांची सोडत दीड महिन्यांपासून रखडली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्तेच सोडत काढण्यावर म्हाडा ठाम आहे. मात्र म्हाडाला मुख्यमंत्र्यांची वेळच मिळत नसल्याने सोडत रखडली आहे. मुख्यमंत्र्यांची वेळ घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे कारण पुढे करीत म्हाडा वेळ मारून नेत आहे. असे असताना आता फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सोडत काढण्यात येईल, अशी माहिती राज्याचे गृहनिर्माणमंत्री अतुल सावे यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. मुख्यमंत्र्यांनी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सोडतीसाठी वेळ देण्याचे आश्वासन दिल्याचेही त्यांनी सांगितले.
कोकण मंडळाच्या ५३११ घरांपैकी २२७८ घरांसाठी २४ हजार ३०३ आणि उर्वरित घरांसाठी २३ हजार ३०३ अर्ज प्राप्त झाले आहेत. पात्र अर्जांची अंतिम यादीही प्रसिद्ध झाली आहे. मात्र सोडत रखडली आहे. १३ डिसेंबर रोजी काढण्यात येणारी सोडत तांत्रिक कारणामुळे पुढे ढकलण्यात आली आणि अजूनही सोडतीची नवीन तारीख जाहीर झालेली नाही. मुख्यमंत्र्यांच्याच हस्ते सोडत काढण्यावर म्हाडा ठाम आहे. मात्र मुख्यमंत्र्यांची वेळच मिळत नसल्याने सोडत मार्गी लागत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, २६ जानेवारी रोजी वेळ देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार म्हाडाने तयारीही सुरू केली होती. मात्र हा मुहूर्तही चुकला असून आता २५ हजार अर्जदारांची प्रतीक्षा पुन्हा वाढली आहे.
आता गृहनिर्माणमंत्र्यांनी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सोडतीसाठी मुहूर्त निश्चित केला आहे. मुख्यमंत्र्यांची वेळ घेण्यात येत असून आता त्यांनी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात वेळ देऊ असे सांगितले आहे. लवकरच मुख्यमंत्र्यांची वेळ निश्चित करून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सोडत काढण्यात येईल, असे अतुल सावे यांनी सांगितले.