जयेश सामंत

शिवसेनेतील फुटीर आमदारांचा सातत्याने ‘गद्दार’ असा उल्लेख करणाऱ्या उद्धव आणि आदित्य ठाकरे यांना ‘कुणी केली गद्दारी ? ’ असा प्रतिप्रश्न करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यातून मुंबई आणि महानगर क्षेत्रात आगामी काळात होणाऱ्या महापालिका निवडणुकांचे एकप्रकारे रणशिंग फुंकल्याचे पहायला मिळाले.  मेळाव्यात भाषणासाठी उभे रहाण्याच्या काही तासांपुर्वी ‘मेरे बेटे, बेटे होने से मेरे उत्तराधिकारी नही होंगे, जो मेरे उत्तराधिकारी होंगे, वो मेरे बेटे होंगे’ या हरिवंशराय बच्चन यांच्या ओळींचे ट्वीट करत शिंदे यांनी घराणेशाहीच्या मुद्दयावर ठाकरे पिता-पुत्रांची कोंडी करण्यासाठी  वातावरण निर्मीती केली होती. हाच मुद्दा पुढे नेत उद्धव यांनी शिवसेना वाढविण्यासाठी काय केले असा सवाल करत शिंदे यांनी नोकर आणि मालकाचा संदर्भ देत शिवसैनिकांची सहानभूतीही मिळविण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, कॉग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसशी सोबत केलेली आघाडी, भाजपशी मोडलेली युती आणि हिंदूत्वाच्या मुद्दयावर ठाकरे पिता-पुत्रांवर टीका करतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे कौतुक केल्याने, मुंबई महापालिका निवडणुकीत शिंदे यांचा प्रचार भाजपच्या वाटेनेच पुढे चालेल हे देखील स्पष्ट होऊ लागले आहे.

ठाकरे-पिता पुत्रांवर टीका

ल्लमुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर गेल्या काही महिन्यांपासून भाजपने आक्रमकपणे महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या मुद्दयावर उद्धव ठाकरे यांना कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. शिंदे यांनी आपल्या भाषणात मुंबई महापालिकेच्या कारभाराबद्दल बोलणे टाळले असले तरी त्यांच्या पुर्वीच्या वक्त्यांनी मात्र महापालिकेतील भ्रष्टाचार, कंत्राटी कामांमधील टक्केवारी, करोना काळातील गैरव्यवहाराचे मुद्दे उपस्थित करत भाजपच्या आरोपांची उजळणी यानिमीत्ताने करण्याचा प्रयत्न केला.  खासदार आणि ठाकरे कुटुंबियांचे एकेकाळचे निष्ठानंतर राहूल शेवाळे यांनी तर मुंबई महापालिकेतील ‘खोके’ कुणाला मिळाले असा सवाल करत थेट मातोश्रीवर साधलेला निशाणा यावेळी लक्षवेधी ठरला. 

ल्लठाकरे गटाकडून सातत्याने होणाऱ्या गद्दार आणि खोकेबाज आरोपांना जशाच तशे उत्तर देण्याची रणनिती बीकेसी येथील मेळाव्यात आखण्यात आल्याचे अगदी स्पष्टपणे जाणवत होते. मेळाव्याला सुरुवात होताच शिंदे गटाकडून तयार करण्यात आलेली ‘ कुणी केली गद्दारी ?’ ही चित्रफिती मेळाव्यात मुख्यमंत्री काय बोलणार याचे संकेत देणारी ठरली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जुनी वक्तवे, त्यांची भाषणे, काँग्रेस-राष्ट्रवादीचा त्यांनी शेलक्या शब्दात केलेल्या उल्लेखांचा या चित्रफीतीत समावेश करण्यात आला होता. मुख्यमंत्र्यांनी भाषणात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी केलेली आघाडी आणि घराणेशाहीच्या मुद्दयावरुन ठाकरे कुटुंबियांवर प्रश्नांची सरबत्ती करत याच चित्रफितीची री ओढल्याचे दिसले. 

ल्लकरोना  काळात सर्व दुकाने बंद करताना तुमचे ‘दुकान’ सुरु होते असा आरोप करत शिंदे यांनी पहिल्यांदाच ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे भ्रष्टाचाराचे आरोप केला. भाजपकडून मातोश्रीवर थेट आरोप केले जात असताना शिंदे यांनीही आगामी काळात या मुद्दयावर वेळ आली तर बोलेन असे सांगत ठाकरे यांना इशारा दिला. याच वेळी बाळासाहेबांनंतर शिवसैनिकांची सातत्याने अवहेलना झाल्याचे सांगत शिवसैनिकांना आपल्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न केला. उद्धव यांचा कारभार म्हणजे हम दो हमारे दोन, ते मालक झाले आणि शिवसैनिक नोकर ठरले अशी वक्तव्य करत तळागाळातील शिवसैनिकांसाठी आपली दारे सदैव उघडी असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. मुंबईत संघटनात्मक पातळीवर घट्ट पाळेमुळे असलेल्या आणि शाखाशाखांमधून कार्यरत असलेल्या शिवसैनिकांनी ही एकप्रकारची साद असल्याचे दिसून आले. 

ल्लमोदी-शहा यांचे कौतुक करत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याची महती देखील शिंदे यांनी सांगितली. मुंबई महानगर प्रदेशात आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीत शिंदे गट भाजपच्या मार्गावर चालेल याचे संकेत दिले.

Story img Loader