मुंबई: ‘मुख्यमंत्री वैद्यकीय मदत सहाय्यता निधी’च्या माध्यमातून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्षावधी गरजू व गरीब रुग्णांना आर्थिक मदत उपलब्ध करून दिली होती. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आता मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी’च्या माध्यमातून गरीब रुग्णासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत खुली करून दिली आहे. महत्त्वाचे म्हणजे पूर्वी समावेश नसलेल्या खर्चिक आजारांचा या योजनेत समावेश करण्यात आल्यामुळे गेल्या १३ महिन्यांमध्ये तब्बल ३२ हजार रुग्णांना त्याचा लाभ मिळाला आहे. या ३२ हजार रुग्णांना मुख्यमंत्री वैद्यकीय महाय्यता निधीमधून तब्बल २६७ कोटी ५० लाख रुपये मदत देण्यात आली आहे.

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर तात्काळ जुलै महिन्यात ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता मदत निधी योजने’ला गती देण्याचे आदेश जारी केले होते. तसेच यापूर्वी अनेक खर्चिक व गंभीर आजारांचा या योजनेत समावेश नव्हता, तो आता नव्याने करण्यात आला आहे. यात फुफ्फुसाची शस्त्रक्रिया, गुडघे बदल, खुबा बदल शस्त्रक्रिया तसेच अपघातामधील रुग्णांनाही या योजनेतून आर्थिक मदत दिली जात आहे. यासाठी जो अर्ज करावा लागतो त्यात सोपेपणा आणण्यात आल्यामुळे गेल्या १३ महिन्यांत तब्बल ३२ हजारांहून अधिक रुग्णांनी आर्थिक मदतीसाठी अर्ज केले असून या रुग्णांना उपचारासाठी २६७ कोटी ५० लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे.

हेही वाचा…‘पिपाणी’चा राष्ट्रवादीला फटका; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा दावा

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना म्हणजे २०१४ ते मार्च २०१९ या काळात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या माध्यमातून लक्षावधी रुग्णांना मदत करण्यात आली होती. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने ही मदत करण्यात आली होती. परिणामी पाच वर्षांत काही लाख रुग्णांना आर्थिक मदत मिळू शकली. यात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी’च्या माध्यमातून ५७५ कोटी रुपयांची मदत करण्यात आली तर ४७४ धर्मादाय रुग्णालयाच्या माध्यमातून जवळपास १२०० कोटी रुपयांची मदत केल्याचे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षचे तत्कालीन प्रमुख ओमप्रकाश शेट्ये यांनी सांगितले. धर्मादाय रुग्णालयांमध्ये दहा टक्के खाटा या गरीब रुग्णांना मोफत उपचारासाठी तर दहा टक्के खाटा या दुर्बल घटकातील लोकांना पन्नास टक्के सवलतीच्या दरात उपचारासाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी धर्मादाय रुग्णालयात किती गरीब रुग्णांना उपचार केले जातात याचा आढावा घेऊन मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षच्या माध्यमातून याचे नियोजन व नियंत्रण करण्यास सुरुवात केली. यासाठी या कक्षेत स्वतंत्र डॅशबोर्ड तयार करण्यात आला होता. यामुळे कोणत्या धर्मादाय रुग्णालयात किती खाटा या योजनेत उपलब्ध आहे व किती लोकांना मदत मिळते याची रोजची माहिती उपलब्ध होऊ लागली. परिणामी राज्यातील ४७४ धर्मादाय रुग्णालयांच्या माध्यमातून लाखो गरीब व दुर्बल घटकातील रुग्णांना फडणवीस यांनी वैद्यकीय मदत मिळवून दिली होती. यात कॉक्लिअर इंप्लांट व लहान मुलांच्या ह्रदय शस्त्रक्रिया प्राधान्याने करण्यात आल्या होत्या.

मुख्यमंत्री शिंदे यांनी या योजनेत अनेक नवीन आजारांचा समावेश केला आहे. तसेच जन्मत: कर्णबधिर मुलांच्या कॉक्लिअर इंप्लांट शस्त्रक्रियेसाठी तीन लाख रुपये या योजनेतून मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थिक मदत देण्यासाठी पाच प्रकारचे निकष निश्चित करण्यात आले आहेत. यात ह्रदय शस्त्रक्रिया, फुफ्फुस प्रत्यारोपण, बोनमॅरो व ह्रदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी दोन लाख रुपयांपर्यंत मदत दिली जाणार आहे. गुडघा वा खुबा बदल शस्त्रक्रिया, मेंदू रोग, कर्करोग, लहान बालकांचे आजार, अपघातातील शस्त्रक्रिया आदीसाठी एक लाख रुपयांपर्यंत मदत केली जाईल तर डायलिसिस, केमोथेरपी, जळीत रुग्ण, अस्थिबंधन आदींसाठी ५० हजार रुपये मदत मिळेल. या शिवाय अन्य आजारांसाठी आवश्यकतेप्रमाणे २५ हजार रुपये मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. वरील निकषात कोणते रुग्ण बसू शकतात व त्यांना नेमकी किती मदत दिली जावी हे निश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षात तज्ज्ञ डॉक्टरांची एक समिती नेमण्यात आली असून ती याबाबत निर्णय घेते असे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी सांगितले.

हेही वाचा…अजित पवार गटाच्या आमदारांची आज बैठक;आमदार शरद पवार गटात परतण्याच्या चर्चेने अस्वस्थता

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष मुंबई मंत्रालय कार्यालयामधून तब्बल २४३ कोटींपेक्षा अधिक तर नागपूर कार्यालयमधून २४ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य वाटप ३२,१२७ रुग्णांना करण्यात आले. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता मदत मिळवण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया राबविण्यात येत असल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना मुंबईत मंत्रालयात येण्याची गरज राहिलेली नाही. रुग्णांनी किंवा रुग्णांच्या नातेवाईकांनी स्वतः थेट अर्ज करून मदत मिळण्यासाठी ८६५०५६७५६७ या टोल फ्री क्रमांकावर कॉल केल्यास त्यांच्या मोबाईलवर अर्ज उपलब्ध करून दिला जातो. या योजनेमुळे रुग्णांचे प्राण वाचत असल्याने मुख्यमंत्री कार्यालयात आलेला एकही रुग्ण मदतीविना वंचित राहता कामा नये याची दक्षता घेण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत. यातूनच १३ महिन्यात ३२,००० पेक्षा अधिक गोरगरीब गरजू रुग्णांना एकूण २६७ कोटी ५१ लक्ष रुपयांची आर्थिक मदत वितरित केल्याचे मंगेश चिवटे यांनी सांगितले. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये विविध आजारांचा समावेश करण्यात आल्यामुळे अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, कर्करोगावरील शस्त्रक्रिया, केमोथेरपी, डायलिसिस, जन्मतः मूकबधिर लहान मुलांच्यासाठी अत्यावश्यक असणारी कॉकलीयर इनप्लांट शस्त्रक्रिया, सर्व प्रकारचे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, रस्ते अपघात , विद्युत अपघात , भाजलेले रुग्ण, जन्मतः लहान मुलांच्या हृदयशस्त्रक्रिया आदींचा समावेश आहे. दुर्धर आजारांनीग्रस्त रुग्णांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी केले आहे.

Story img Loader