अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक गेल्या काही दिवसांपासून निवडणूक राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू होती. या निवडणुकीचा आज निकाल जाहीर झाला असून यात ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा ६० हजारांहून अधिक मतांनी विजय झाला आहे. दरम्यान, या निकालाबाबत विचारले असता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन वाक्यात प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा – “…तर ऋतुजा लटकेंचा पराभव निश्चित होता”; अंधेरी पोटनिवडणुकीच्या निकालानंतर आशिष शेलारांचं मोठं विधान
आज विविध पक्षातील तीन ते चार हजार पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या पक्षात प्रवेश केला. या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना अंधेरी पोटनिवडणुकीच्या निकालाबाबत विचारले असता, त्यांनी दोन वाक्यात प्रतिक्रिया दिली. “या निवडणुकीत राजकीय संस्कृती म्हणून आमच्या युतीने माघार घेण्याचा निर्णय घेतला होता, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत”, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
हेही वाचा – Andheri By Poll: ऋतुजा लटके यांच्या विजयानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले “मशाल भडकली आणि…”
दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी ”भाजपाच्या मदतीनेच ऋतुजा लटकेंचा विजय झाला” या आशिष शेलारांच्या विधानाचेही समर्थन केले. “शेलारांनी म्हटले आहे, ते खरे आहे. रमेश लटकेंचे निधन झाल्यानंतर महाराष्ट्राची पंरपरा पाळण्याचे काम भाजपा आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेने केले आहे”, असेही ते म्हणाले.