शिवसेनेकडून ( शिंदे गट ) राज्यातील प्रमुख वृत्तपत्रांमध्ये दिलेल्या जाहिरातीवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. यापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात ‘देशात नरेंद्र अन् राज्यात देवेंद्र’ अशी घोषणा दिली जात होती. पण, शिवसेनेकडून ( शिंदे गट ) आज वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावार देण्यात आलेल्या जाहिरातीवर ‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ असा मजकूर छापण्यात आला आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “आमचं सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे. ‘हे डबल इंजिन’चं सरकार आहे. केंद्र सरकारकडून महाराष्ट्रातील विकास प्रकल्पांना मोठ्या प्रमाणात निधी आणि आर्थिक पाठबळ दिलं जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या काळात मेट्रो, पायाभूत सुविधांचे प्रकल्प बंद होते, ते आम्ही तात्काळ सुरू केले.”
हेही वाचा : “जाहिरातीत बाळासाहेबांचा फोटो टाकायला तंतरली, मोदी, शाहांचे इतके…”, संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना थेट सवाल
“घरात बसून काम करत नाही”
“मुंबईतच नाहीतर संपूर्ण राज्यात वेगवान प्रकल्प सुरू आहेत. राज्याला पुढं नेत सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न मी आणि देवेंद्र फडणवीस करत आहे. प्रत्यक्ष रस्त्यावर, शेतकऱ्यांच्या शेतात आणि प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी जातो. घरात बसून काम करत नाही,” असा टोला मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
“पंतप्रधान, गृहमंत्री आमचे प्रस्ताव मंजूर करतात”
“राज्यातील जनतेने एका सर्वेच्या माध्यमातून मला आणि देवेंद्र फडणवीसांना पसंती दिली आहे. त्यामुळे आणखी जोमाने आम्ही काम करू. या कामाचा फायदा सर्वसामान्य लोकांना होईल. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह आम्ही पाठवलेले प्रस्ताव मंजूर करतात. म्हणून विकासाचे प्रकल्प जोरात, जोमात आणि वेगात पुढं नेत आहे,” असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं.
हेही वाचा : “दया, कुछ तो गडबड है”, सचिन सावंत यांनी शेअर केलं CID चं मीम; ‘त्या’ जाहिरातीवरून शिंदे-फडणवीसांना टोला!
“शिवसेना-भाजपा युती भक्कम”
“शिवसेना-भाजपा युती ही बाळासाहेबांच्या विचाराने झाली आहे. ही एक वैचारिक युती असून, स्वार्थ, खुर्ची आणि मला काहीतरी मिळेल, यासाठी झाली नाही. म्हणून ही युती भक्कम आहे. शिवसेना-भाजपा महायुती लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण ताकदीने लढत विकासाच्या मुद्द्यावर जिंकू,” असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.