मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळय़ाला ३५० वर्षे पूर्ण होत असल्याने सांस्कृतिक कार्य विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांचे शौर्य, कार्य आणि विचार यांचे स्मरण मंत्रालयात गुरुवारपासून वर्षभर दररोज होणार आहे. सकाळी १०.४५ वाजता दोन ते तीन मिनिटांची ध्वनिफीत सार्वजनिक उद्घोषणा यंत्रणेमार्फत प्रसारित केली जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या उपक्रमाचे बुधवारी मंत्रालयात उद्घाटन केले आणि ‘ माझी माती, माझा देश ’ या उपक्रमात शासकीय कर्मचाऱ्यांना पंचप्रण शपथ दिली.
देशाला २०४७ पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकार केले जाईल, गुलामीची मानसिकता नष्ट करून देशाला बलशाली केले जाईल. देशाचे संरक्षण करणाऱ्यांचा सन्मान ठेवून नागरिकाच्या कर्तव्यांचे पालन केले जाईल, अशी पंचप्रण शपथ कर्मचाऱ्यांना देण्यात आली.
या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे आदी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक गडकिल्ले व लढाया जिंकल्या, पराक्रम केले.
या पराक्रमाची गाथा ऐकविली जाणार आहे. त्याचबरोबर राज्यकारभार कसा करावा आणि जनतेप्रती कर्तव्यांचे पालन कसे करावे, याचा वस्तुपाठच घालून दिला आहे. महाराजांच्या आज्ञावलींमधूनही ही प्रचिती येते. जनताभिमुख राज्यकारभार करताना शिवाजी महाराजांनी साकारलेल्या रामराज्यातून राज्यकर्ते आणि कर्मचाऱ्यांनी प्रेरणा घ्यावी व त्याचे स्मरण करावे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. त्यामुळे दिनविशेषांचे औचित्य साधून तीन मिनीटांच्या ध्वनिफीती तयार करण्यात येत आहेत. त्याचे ध्वनिमुद्रण फिल्मसिटीत करण्यात येत आहे.
या उपक्रमाचे उद्घाटन करताना शिंदे म्हणाले, महाराष्ट्र हे देशाच्या विकासाचे इंजिन आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श कार्य डोळय़ासमोर ठेवून आपण राज्याचा कारभार करीत आहोत.
दरम्यान, १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत ‘ घरोघरी तिरंगा ’ हे अभियान राबविण्यात येते. यंदाच्या अभियानाची सुरुवात शिंदे यांच्या हस्ते करण्यात आली.