मुंबई : मुंबईतील वाढते प्रदूषण आणि धुळीच्या प्रश्नावर मुंबई महानगरपालिकेने केलेल्या उपाययोजनांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी भल्या पाहाटे पाहणी केली. मुंबईतील वांद्रे, सांताक्रूझ, जुहू या परिसराला भेट देऊन त्यांनी तेथे सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. तसेच त्यांनी त्यात काही बदलही सुचवले.
मुंबईतील वाढते प्रदूषण आणि धूळ कमी करण्यासाठी महानगरपालिका पाण्याने रस्ते धुवून काढत आहे. पहाटे केल्या जाणाऱ्या या कामांची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. तसेच रस्त्याच्या कडेला साचणारी धूळ आणि माती हटविण्यासाठी वापरण्यात येत असलेली स्वयंचलित वाहने आणि फॉग मशिन्स यांचीही मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. ठिकठिकाणी स्वच्छता कामगार करीत असलेल्या कामाचा आढावा त्यांनी घेतला. तसेच मुंबई शहर स्वच्छ आणि सुंदर दिसावे यासाठी काही सूचना त्यांनी केल्या. या कामाची सुरुवात वांद्रे येथील कलानगर परिसरातून करण्यात आली. संपूर्ण मुंबई आपल्याला स्वच्छ करायची आहे, असे एकनाथ शिंदे यांनी या पाहणी दौऱ्यादरम्यान सांगितले.
हेही वाचा – मुंबई-जीवी : सुमधुर आवाजाचा दयाळ
मुंबई स्वच्छ करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या स्वच्छता कामगारांचीही त्यांनी विचारपूस केली. तसेच त्यांच्या वसाहतींच्या कामाची प्रगतीही जाणून घेतली. यावेळी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे, तसेच मुंबई महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी तसेच शिवसेनेचे पदाधिकारी आणि स्वच्छता कामगार यावेळी उपस्थित होते.