मुंबई:  आपली संस्कृती, कला जोपासलीच पाहिजे. ती आपली जबाबदारी आहे. त्यामुळे मराठी नाटय़, चित्रपट आणि कला क्षेत्राला गतवैभव प्राप्त व्हावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांनी मला तुमचं ऐकायचंय..! आपण एकमेकांबद्दल बोलत असतो. आता एकमेकांशी बोलू या., असं म्हणत   मराठी नाटय़, चित्रपट आणि मालिका क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधला.

मुख्यमंत्री म्हणाले, या क्षेत्रातील पडद्यामागील कलावंत, तंत्रज्ञ यांच्याची निगडित अनेक विषय आहेत. त्यांना परवडणारी घरे उपलब्ध व्हावीत यापासून विमा संरक्षण अशा बाबतीत निर्णय घेतले जातील. गोरेगावच्या दादासाहेब फाळके चित्रनगरीमध्ये चांगले रस्ते, पायाभूत सुविधा आणि स्वच्छतेची सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश शिंदे यांनी दिले. चित्रपटांना वस्तू आणि सेवा करातून सूट, ज्येष्ठ कलाकारांसाठी मानधन योजना, त्यांना विनामूल्य वैद्यकीय सुविधा, ज्येष्ठ कलाकार, वादक, तंत्रज्ञ आदींना विमा संरक्षण याबाबत  बैठक घेऊन मार्ग काढण्याची ग्वाही दिली.  प्रशांत दामले, अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, महेश कोठारे, वर्षां उसगांवकर, विद्याधर पाठारे,  मंगेश कुलकर्णी, पुष्कर श्रोत्री, जितेंद्र जोशी, अवधूत गुप्ते, विजय पाटकर, विजय केंकरे, प्रसाद ओक, चंद्रकांत कुलकर्णी आदींनी समस्या मांडल्या.

Story img Loader