मी नवाब मलिकांना देशद्रोही म्हटलं होतं असं म्हणत देशद्रोही वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. विधीमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानावर विरोधी पक्षाने बहिष्कार टाकल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी बहिष्कार टाकल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बरं झालं देशद्रोह्यांबरोबरचं चहापान टळलं असं म्हणत टीका केली. यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री मला देशद्रोही म्हणाले असा आरोप करत त्यांच्यावर हक्कभंग आणण्याची मागणी केली होती. यावर आज विधानपरिषदेत सभापतींच्या परवानगीने मुख्यमंत्र्यांच्या केलेल्या विधानाबद्दल खुलासा केला. एकनाथ शिंदे म्हणाले, मी त्या पत्रकार परिषदेत अजितदादांना देशद्रोही म्हणालो नव्हतो हे माझं वक्तव्य अजित पवार, अंबादास दानवे यांच्याबद्दल नव्हतो. मी जे बोललो ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री नवाब मलिक यांच्याबद्दल होते. मलिक यांच्यावर एनआयए, ईडीकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
देशद्रोही दाऊद इब्राहिम, छोटा शकील, इकबाल मिर्ची, हसीना पारकर यांच्यांशी संबंध व आर्थिक व्यवहार केल्याचा मलिक यांच्यावर आरोप आहे. त्यानूसार मलिकांवर देखील देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालेला आहे. हसीना पारकर या दाऊद इब्राहीमच्या बहिणीसोबत मलिकांनी जमीन आणि गाळे खरेदी विक्रीचा व्यवहार केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. गोवावाला कंपाऊंडमधील काही गाळ्यांवर नवाब मलिक यांनी १९९५ मध्ये अवैध कब्जा केला होता.
उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
देशद्रोह केलेल्यांसोबत चहा घेण्याची वेळ टळली, असं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या या विधानाचा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला आहे. देशद्रोह्यांसोबतची चहापानाची वेळ टळली असं मुख्यमंत्री म्हणाले तर त्यांचं चहापान कुणाबरोबर होतं? देशद्रोह्यांबरोबरच चहापान टळलं असं म्हणता तर विरोधक देशद्रोही होते का? ते देशद्रोही नव्हते. तर मग तुमचं चहापान कोणत्या देशद्रोह्यांसोबत होतं? मुख्यमंत्र्यांनीही देशद्रोही कोण आणि कुणाबरोबर चहापान घेणार होते हे स्पष्ट केलं पाहिजे. ते देशद्रोही कुणाला बोलले हे कळू द्या, असं आव्हानच उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना दिलं.