नायर रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकाने लैंगिक छळ केल्याची तक्रार एका विद्यार्थिनीने दाखल केली आहे. या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जातो आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही याप्रकरणाची दखल घेतली असून याप्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष समिती नेमण्याचे आदेश दिले आहेत. तसेच आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.

चौकशीसाठी विशेष समितीची स्थापना

मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांना रुग्णालयाच्या डीनची तात्काळ बदली करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी एका विशेष समितीची स्थापना करण्यात येणार आहे. रुग्णालयातील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अतिरिक्त उपाययोजना राबवण्यात येतील, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा – नायर रुग्णालय प्रकरण : वैद्यकीय विद्यार्थिनीच्या लैंगिक छळाप्रकरणी सहयोगी प्राध्यापकाचे निलंबन

सुरक्षित वातावरण निर्माण करणे आमचे कर्तव्य

यासंदर्भात बोलताना, “आरोग्य क्षेत्रातील अशा घटना अत्यंत गंभीर आहेत. आम्ही या प्रकरणाचा तपास करून दोषींवर कडक कारवाई करू. रुग्णालयातील सर्वांसाठी एक सुरक्षित वातावरण निर्माण करणे हे आमचे कर्तव्य आहे.” अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

हेही वाचा – Maharashtra News Live : “महिला सुरक्षेच्याबाबतीत शिंदे सरकार असंवेदनशील”; पुण्यात अल्पवयीन मुलींवरील सामुहिक बलात्कार प्रकरणावरून सुप्रिया सुळेंची टीका!

आरोपी प्राध्यापकाला निलंबनाची कारवाई

दरम्यान, विद्यार्थिनीच्या तक्रारीनंतर पालिका प्रशासनाने आरोपी प्राध्यापकाला निलंबित केले आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी महानगरपालिका मुख्यालय स्तरावरील सावित्रीबाई फुले स्त्री संसाधन केंद्र प्रमुख अंतर्गत तक्रार समितीकडे सोपवण्यात आली आहे. या समितीकडून चौकशीची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर प्राप्त होणाऱ्या निष्कर्षानुसार पुढील कारवाई केली जाईल, असे महानगरपालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.