मुंबईत पहिल्याच पावसाने गटारं तुंबून सर्वत्र पाणी साचलेलं पाहायला मिळालं. याबाबत पत्रकारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी या प्रश्नावर नाराजी व्यक्त केली. पाऊस झाला याचं स्वागत करा, असं म्हणत त्यांनी पाणी साचलं ही तक्रार का करता असं म्हटलं. ते शनिवारी (२४ जून) मुंबईत मराठा मंदिर अमृत महोत्सवानंतर पत्रकारांशी संवाद साधत होते.
पत्रकारांनी मुंबईत पहिल्याच पावसानंतर पाणी तुंबल्याबद्दल प्रश्न विचारला. त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले, “अरे बाबा, पाऊस झालं याचं स्वागत करा. पाणी साचलं हे काय. पाऊस झाला त्यावर बोलत नाहीत.”
“पाऊस झाल्याने सर्वांनाच मनापासून आनंद झाला”
“आज पाऊसाची चांगली सुरुवात झाली आहे. बळीराजा आणि आपण सगळे त्याचं आनंदाने स्वागत करुयात. गेले अनेक दिवस आपण पावसाची आतुरतेने वाटत पाहत होतो. आज पाऊस चांगला सुरू झाला आहे. राज्यभर पेरण्या झाल्या आहेत. आजचा पाऊस शेतकऱ्यासाठी अतिशय उत्तम आहे. पाऊस झाल्याने सर्वांनाच मनापासून आनंद झाला आहे,” असं मत एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलं.
व्हिडीओ पाहा :
“सरकारवर दररोज खालच्या पातळीवरील आरोप”
उद्धव ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर केलेल्या टीकेवर एकनाथ शिंदे म्हणाले, “सरकारवर दररोज खालच्या पातळीवरील आरोप होत आहेत. मुख्यमंत्र्यांसह सर्वांवर आरोप केले जात आहेत, पातळीसोडून बोललं जात आहे. हे सर्वजण पाहत आहेत. काही दिवसांपूर्वी माझा नातू रुद्रांशलाही राजकारणात ओढलं गेलं. त्या लहान मुलाला राजकारण काय कळतं.”
“फडणवीसांनी अनेकदा या माजी मुख्यमंत्र्यांना मदत केली”
“मी त्यांची लायकी म्हणणार नाही, परंतु देवेंद्र फडणवीसांनी अनेकदा या माजी मुख्यमंत्र्यांना मदत केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांना मदत केली आहे. त्यांनी याची किमान जाणीव तरी ठेवली पाहिजे. कारण देवेंद्र फडणवीसांबरोबर मी काम केलं आहे. मी त्याचा साक्षीदार आहे. हे कसला आरोप करत आहेत,” असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.