म्हाडा’च्या मुंबई मंडळाच्या ४ हजार ८२ घरांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज, सोमवारी सोडत काढण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईबाहेर गेलेल्या मुंबईकरांना एक आशेचा किरण दाखवला आहे. मुंबईबाहेर गेलेल्या मुंबईकरांना मुंबईत आणण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण केंद्र येथे हा कार्यक्रम पार पडला.
“गेल्या अनेक वर्षांचे प्रश्न प्रलंबित आहेत. हे प्रश्न जादूच्या छडीसारखे सोडवता येणार नाहीत. पण जी कामं थांबली होती ती आता सुरू करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस २०१४-१९ काळात मुख्यमंत्री होते. त्या काळात मीही कॅबिनेटमध्ये होते. तेव्हाही अनेक निर्णय आम्ही घेतले होते. परंतु, मागच्या अडीच वर्षांच्या काळात अनेक कामे थांबली”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
हेही वाचा >> MHADA Mumbai Lottery: ‘या’ लिंकद्वारे पाहा सोडतीचे थेट प्रक्षेपण
“आमचं सरकार सत्तेवर आल्यानंतर पहिल्या कॅबिनेटपासूनच आम्ही सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेण्यास प्राधान्य दिलं आहे. राज्यातील प्रत्येक घटकाला न्याया मिळाला पाहिजे, यासाठी आम्ही कॅबिनेटमध्ये निर्णय घेतले. कोणताही घटक वंचित राहिला नाही पाहिजे. गिरणी कामगार, म्हाडा, वरळी बीडीडी चाळीतील लोकांसाठी महत्त्वाचे निर्णय या काळात घेण्यात आले”, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
“मुंबईकर पुन्हा मुंबईत येणार आहे. काही प्रकल्प रखडलेले आहेत. या सरकारने ठरवलं आहे की जे रखडलेले प्रकल्प आहेत,एसआरए, बीडीडी चाळी, धोकादायक इमारती, म्हाडाच्या इमारतीत हे पूर्णत्वास न्यायचे. काही लोक मुंबईच्या बाहेर गेले. मुंबईकरांना पुन्हा मुंबईत आणायचं असेल तर रखडेलेल प्रकल्प पुढे गेले पाहिजेत, चालना दिली पाहिजे. नियमांत बदल करायलाही तयार आहेत, बरेच बदल केलेही आहेत”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.