संजय बापट, लोकसत्ता
मुंबई : औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण करण्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी स्थगिती दिली. मुख्यमंत्रिपदावरून पायउतार होताना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने घेतलेले सर्व निर्णय रोखण्याचे आदेश नव्या सरकारने दिले असून, मुख्यमंत्री या सर्व निर्णयांचा फेरआढावा घेणार आहेत.
शिवसेनेत बंडाळीचे नेतृत्व करणारे एकनाथ शिंदे हे भाजपबरोबर सत्ता स्थापन करणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने अखेरच्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक लोकप्रिय निर्णय घेतले होत़े या मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबाद शहराचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशीव असे नामकरण करतानाच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याचप्रमाणे िहगोली जिल्ह्यात बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापन करणे, कर्जत (जि. अहमदनगर) येथे दिवाणी न्यायालय, अहमदनगर – बीड – परळी वैजनाथ या नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या सुधारित खर्चास मान्यता, ग्रामीण भागातील विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना राबिवणे, विदर्भ विकास मंडळ, मराठवाडा विकास मंडळ व उर्वरित महाराष्ट्र विकास महामंडळांचे पुनर्गठन, निवड झालेल्या परंतु मराठा आरक्षण रद्द झाल्याने नियुक्ती न मिळालेल्या मराठा (एसईबीसी) उमेदवारांसाठी अधिसंख्य पदे निर्माण करणे, वांद्रे शासकीय वसाहतीतील रहिवाशांना हक्काची घरे देण्याचे निर्णय यावेळी घेण्यात आले होते.
मात्र, राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यास सांगितल्यानंतर सरकारला असे निर्णय घेता येत नाहीत, अशी भूमिका घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयांना आक्षेप घेतला होता. त्यानुसार गुरुवारी मंत्रिमंडळ बैठकीत या सर्व निर्णयांना स्थगिती देण्यात आली असून, मुख्यमंत्री शिंदे पुन्हा या निर्णयांचा फेरआढावा घेणार आहेत़ नामांतराचा निर्णय नव्याने घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. ठाकरे सरकारने घेतलेल्या सर्व निर्णयांना स्थगिती दिली जाणार नाही, असे फडणवीस यांनी मागेच स्पष्ट केले होते.