मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांची ईडीमार्फत चौकशी करण्यात येत आहे. भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी चहल यांच्याविरोधात पत्रकार परिषद घेऊन अनेक आरोप लावले होते. महाविकास आघाडीचे सरकार असताना चहल यांची मुंबईच्या आयुक्तपदी नियुक्ती झाली होती. त्यामुळे ते ठाकरे यांच्या जवळचे असल्याचे मानले जात होते. त्यामुळेच ठाकरेंना अडचणीत आणण्यासाठी त्यांची चौकशी केली जात असल्याचा कयास बांधला जात होता. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच इकबाल सिंह चहल यांचे कौतुक केले. त्यामुळे अनेकांच्या भुयवा उंचावल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकनाथ शिंदे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी२० परिषदेनिमित्त महाराष्ट्राच्या चार शहरात याचे कार्यक्रम ठेवण्यास परवानगी दिली. त्यापैकीच एक कार्यक्रम मुंबईत झाला. जगभरातले मान्यवर मुंबईत आले होते. त्यावेळी त्यांनी मुंबईचे कौतुक केले. त्यासाठी मी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांना धन्यवाद देईल. त्यांनी खूप चांगले काम केले. मुंबईला त्यांनी चमकावले. त्यामुळे काही लोकांच्या पोटात दुखायला लागले. हे कसे काय झाले? असा त्यांना प्रश्न पडला. त्यांनाही १५-२० वर्ष संधी मिळाली. मात्र त्यांना मुंबईचे सुशोभिकरण जमले नाही. चांगल्या कामाला चांगले म्हटले पाहीजे.”

हे वाचा >> “काहींची इच्छा होती की, मोदीजींच्या हस्ते लोकार्पण होऊ नये; पण नियतीच्या…” मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची मविआवर टीका

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ट्रिपल इंजिन दिसेल

आम्हाला मुंबईचा विकास करायचा आहे. मुंबईचा चेहरामोहरा बदलायचा आहे. मागच्या २५ वर्षांत जे झाले नाही, ते आम्हाला करुन दाखवायचे आहे. कुणी कितीही टीका केली, तरी मुंबईकरांना आमचे काम दिसत आहे. मुंबईच्या बाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. पुढील तीन वर्षात मुंबईचा कायापालट करण्याचा प्रयत्न आम्ही करु. काही दिवसांतच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका येत आहेत. त्यावेळी विकासाच्या या डबल इंजिनला ट्रिपल इंजिनमध्ये बदलू, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले.

करोना काळात कायद्यानुसारच सर्व कामे झाली

करोना केंद्रांबाबत सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सोमवारी चहल यांची सुमारे चार तास चौकशी केली. या प्रकरणातील कागदपत्रे ‘ईडी’कडे सुपूर्द केली असल्याचे चहल यांनी चौकशीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले. ते म्हणाले,‘‘मार्च २०२० मध्ये करोनाची साथ आली. तेव्हा महापालिकेकडे केवळ तीन हजार ७५० खाटा उपलब्ध होत्या. मुंबईची लोकसंख्या एक कोटी ४० लाख असताना खाटांची संख्या अगदी कमी होती. लाखो नागरिकांना संसर्ग होईल, असा अंदाज होता आणि तो खराही ठरला. मुंबईत ११ लाख लोकांना करोनाचा संसर्ग झाला. जून २०२० मध्ये राज्य सरकारने मोकळय़ा मैदानात जम्बो करोना रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महापालिकेने राज्य सरकारला एक निवेदन दिले. करोना साथीमुळे महापालिकेवर अतिशय ताण आहे. त्यामुळे करोना केंद्र बांधण्यासाठी वेळ नाही, असे त्यात म्हटले होते.’’ त्यावेळी निम्मी करोना केंद्रे इतर सरकारी यंत्रणांनी बांधली. त्यात दहिसर, मुलुंड, बीकेसी, बीकेसी टप्पा २, शीव, मालाड आणि कांजुरमार्गमधील केंद्रांचा समावेश आहे. बीकेसीतील केंद्र एमएमआरडीएने तर कांजूरमार्ग केंद्र सिडकोने बांधले. तसेच मुंबई मेट्रो रेलने दहिसरमधील केंद्र बांधले. ही सर्व केंद्रे बांधताना महापालिकेला कोणताही खर्च आला नाही. टप्प्याटप्याने ही जम्बो करोना केंद्रे सज्ज झाली, असेही चहल यांनी सांगितले.