Girish Bapat Passed Away : भाजपाचे पुण्यातील खासदार गिरीश बापट यांचं ७२ व्या वर्षी निधन झालं आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, त्यांची आज प्राणज्योत मालवली. आज संध्याकाळी सात वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे. दरम्यान, त्यांच्या निधानानंतर विविध राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांच्या निधानानंतर शोक व्यक्त केला आहे. टीव्ही ९ वृत्तावाहिनीशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा – टेल्को कंपनीत कामगार ते खासदार; गिरीश बापट यांची कारकिर्द
काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?
“ही अतिशय दुख:द बातमी आहे. आपण एक सच्चा, प्रामाणिक आणि निष्ठावंत कार्यकर्ता गमावला आहे. गिरीष बापट हे गेली अनेक वर्ष सक्रीय राजकारणात होते. त्यांच्या कारकीर्द नगसेवकापासून सुरू झाली. पुढे ते मंत्रीही आणि खासदारही झाले. मंत्रीमंडळात काम करताना आम्ही शेजारीच बसत होतो. त्यांच्या निधनाने भाजपाची तर हानी झालीच, पण आपण एक सच्चा लोकसप्रतिनिधी गमावला आहे”, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
हेही वाचा – Breaking: भाजपा खासदार गिरीश बापट यांचं निधन
“दुर्धर आजाराशी झुंजत असताना देखील गिरीश बापट हे आपल्या पक्षाला ऊर्जा देण्याचे काम करत होते. त्यांच्याशी भेट व्हायची तेव्हा राजकारणातीलच नव्हे, तर अनेक विषयांवर त्यांना असलेली माहिती पाहून चकीत व्हायचो. नुकतीच पुण्यात त्यांची विचारपूस करण्यासाठी भेटही झाली होती. त्यांनी त्यांची राजकीय कारकीर्द अगदी नगरसेवकापासून सुरू केली होती. आमदार खासदार आणि राज्य मंत्रिमंडळात मंत्री म्हणून त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम पुढाकार घेतला”, असंही ते म्हणाले.
हेही वाचा – “गिरीश बापट यांच्या निधनाचं वृत्त अत्यंत दुःखद!” शरद पवार यांनी व्यक्त केल्या भावना
“पालकमंत्री म्हणून पुण्याच्या विकासाच्या दृष्टीने त्यांनी पाऊले उचलली होती. सर्व पक्षांमध्ये त्यांची मैत्री होती. त्यांच्या उत्तम जनसंपर्काचे उदाहरण नेहमी दिले जायचे. महापालिकेत तर पक्षाची सत्ता नसतानाही ते स्थायी समितीचे अध्यक्ष झाले होते. असा दिलदार नेता आज आपल्यातून गेल्याचं दुखं होतंय”, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.