काही दिवसांपूर्वीच केंद्रीय निवडणूक आयोगानं ‘शिवसेना’ पक्षनाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला होता. आयोगाच्या या निर्णयानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी पहिल्यांदाच रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे जाहीर सभा घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी चौफेर टोलेबाजी केली. तसेच मुख्यमंत्र्यांच्या ‘बरं झालं देशद्रोह्यांबरोबरचं चहापान टळलं’ या विधानाचाही त्यांनी समाचार घेतला. आम्हाला देशद्रोही म्हटला, तर जीभ हासडून टाकू, असे ते म्हणाले. दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?
“उद्धव ठाकरेंचं हे विधान हास्यास्पद आहे. रोज उठसूट शिव्या-शाप देणं, आरोप करणं, तपास यंत्रणा, पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्याविरुद्ध खालच्या पातळीवर बोलणं, असे प्रकार रोज सुरू आहेत. कालच्या सभेत स्वातंत्रसैनिकांबातही त्यांनी भाष्य केलं. सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले. बाळासाहेबांनी जे कधीच केल नव्हतं. त्यामुळे बाळासाहेबांचं नाव घेण्याचा नैतिक अधिकार त्यांनी २०१९ ला गमावला आहे”, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं.
हेही वाचा – “मी घरात बसून महाराष्ट्र सांभाळला, पण तुम्ही…”, उद्धव ठाकरेंचं एकनाथ शिंदेंवर टीकास्र
जय शाहांबाबत केलेल्या विधानावरही दिली प्रतिक्रिया
पुढे बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंनी जय शाहांबाबत केलेल्या विधानावरही प्रतिक्रिया दिली. “केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका, आरोप करण्याचा एकच कार्यक्रम सुरू आहे. त्यांना त्यांचे आरोप करू द्या. फक्त उद्या नवाब मलिक आणि अनिल देशमुखांना देशभक्ताची उपमा देऊ नये, एवढचं त्यांना सांगतो”, असे ते म्हणाले.
हेही वाचा- “…तुम्ही संगमांचं काय चाटत आहात?,” उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर घणाघात
उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?
विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी झालेल्या चहापाणाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला होता. यावर बोलताना ‘बरं झालं देशद्रोह्यांबरोबरचं चहापान टळलं’, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते. त्यांच्या या विधानाचा काल उद्धव ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला. “काल परवा मिंधे बोलले, बरं झालं आमचं देशद्रोह्यांबरोबरचं चहापान टळलं. त्यांच्या विधानानंतर सगळ्यांनी धुडगूस घातला. मग ते म्हणाले, नाही… नाही… नाही… मी तुम्हाला उद्देशून देशद्रोही बोललो नाही. अरे पण तुम्ही आम्हाला देशद्रोही बोलूच कसं शकता, बोलला असता तर जीभ हसडून टाकू. कारण आम्ही देशद्रोही नाहीच आहोत. आम्ही देशप्रेमी आहोत. हे मी मुख्यमंत्री म्हणून बोलत नाही, मी मिंधेंना बोलतोय.” अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला होता.