महाराष्ट्रात बाळासाहेबांच्या विचारांचं हिंदुत्ववादी सरकार स्थापन झालं आहे. आत्तापर्यंत थांबलेली आणि थांबवलेली विकासकामं मोठ्या प्रमाणात पुढे जात आहेत. मुंबई ज्यांनी १५ वर्षे ओरबाडली, मुंबईची लूट केली ते आता हिशोब द्यायची वेळ आल्यावर मोर्चे काढत आहेत असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. भाजपा आणि शिवसेनेचं सरकार लोकहिताचे निर्णय घेत असल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. जनता यांच्या नाटकांना फसणार नाही असंही एकनाथ शिंदेनी म्हटलं आहे. खरंतर इतकी वर्षे मुंबई लुटल्यामुळे तुमच्या घरांवरच मोर्चा काढायला हवा असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.
वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी माजी नगरसेवक संजय अगलदरे यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. अनेक माजी नगरसेवक, पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करण्याच्या मार्गावर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आमचे सरकार आल्यानंतर आम्ही मुंबईतील रस्ते क्राँक्रिटीकरणाचा निर्णय घेतला. हा निर्णय १५ वर्षांपूर्वी घेऊन काम केले असते तर मुंबई महापालिकेची साडेतीन हजार कोटींची बचत झाली असती, असे ते म्हणाले. निर्णय वेळेवर न घेतल्याने मुंबईकरांना वर्षानुवर्षे खड्डेमय रस्त्यांवर प्रवास करावा लागला, त्यामुळे विविध अपघातात बळी गेले ते वेगळे असे ते म्हणाले. गेल्या सरकारच्या काळात मेट्रो आणि कारशेड प्रकल्प अडीच वर्षात पूर्णपणे ठप्प होते. रस्त्यांची कामे, काँक्रिटीकरणाची कामे, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अशी विविध लोकाभिमुख कामे पूर्ण व्हायला हवी होती. मात्र संधी असूनही ही कामे ठप्प होती. अशीही टीका मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
कोविड काळातल्या गैरकारभाराची ईडी चौकशी करत आहे. कोविड मध्ये माणसे मरत होती मात्र त्यावेळी काही जण केवळ पैसा कमावण्यात लागले होते. हीच मंडळी आता आम्हाला प्रश्न करत आहेत हे म्हणजे उलटा चोर कोतवाल को डाँटे अशी परिस्थिती आहे, असे प्रत्युत्तर त्यांनी उबाठा कडून होणाऱ्या टीकेवर दिले.
गेल्या १५ वर्षे मुंबईकरांना नुकसान झाले, मोठा त्रास भोगावा लागला. मात्र आता विद्यमान राज्य सरकारच्या माध्यमातून होत असलेल्या कामांमुळे लोकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.
तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांचा पक्ष राज्यात येत असल्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले, निवडणुका लढवायची सर्वांना मुभा असते, मते द्यायचा अधिकार मतदारांना असतो. के.सी.आर. यांनी आधी त्यांचे राज्य, पक्ष सांभाळावा, त्यांच्या राज्यातील नागरिकांना सुविधा पुरवाव्यात, महाराष्ट्रात आम्ही समर्थ आहोत. वारकऱ्यांना सर्व सोयी सुविधा पुरवल्या जात आहेत. कोणतीही गैरसोय होणार नाही याची काळजी राज्य सरकारने घेतली आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन व तानाजी सावंत यावर जातीने लक्ष ठेवून आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.