राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू असून आज मुंबईतील खड्ड्यांविषयी विधानसभेत चर्चा झाली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येत्या एक ते दीड वर्षात मुंबईतील १०० टक्के रस्ते सिमेंटचे करणार असून या रस्त्यांवर एकही खड्डा दिसणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
”डीपी रोड मनपाने ताब्यात घेऊन त्याची कामं करण्यात यावीत, अशा सुचना अनेक सदस्यांनी दिल्या आहेत. त्यानुसार स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि काही तज्ज्ञ यांची एक समिती तयार करण्यात येईल. यासंदर्भात काही दिवसांपूर्वीच मी मुंबई मनपाचे आयुक्त आणि इतर अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत मी अधिकाऱ्यांना डांबरी रस्त्यांऐवजी सिमेंटचे रस्ते करावे, अशा सुचना केल्या असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
हेही वाचा – पत्राचाळ घोटळा प्रकरणातील साक्षीदार स्वप्ना पाटकर यांची आज ईडीकडून चौकशी
पुढे ते म्हणाले, ”मुंबईत ६०३ किमीपैकी २०० किमीच्या सिमेंट रस्त्यांसाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. उर्वरित ४२३ किमीच्या रस्त्यांसाठीही लवकरच निविदा निघेल, एवढच नाही तर, येत्या एक ते दीड वर्षात मुंबई मनपाचे १०० टक्के रस्ते सिमेंटचे आणि ते चांगल्या दर्जाचे होतील, अशी माहितीही त्यांनी दिली. तसेच मागाठाणे ते गोरेगाव पूर्व येथील नियोजित रस्त्याला हा विशेष पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणून मान्यता देऊन तो पूर्ण करण्यात येईल, तशा सूचना मुंबई पालिका आयुक्त यांना दिल्याचे ही मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान, याबाबतची मूळ लक्षवेधी सूचना अतुल भातखळकर यांनी उपस्थित केली होती.