मुंबईतील सुमारे २२०० किलोमीटर लांबीच्या नाल्यांची सफाई व्यवस्थित आणि खोलपर्यंत केल्यास यंदा पावसाळ्यात पाणी साचण्यापासून मुंबईकरांना होणारा त्रास वाचेल. त्यामुळे किती मेट्रिक गाळ काढला यापेक्षा मुंबईत पाणी कुठे तुंबणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. त्यांनी मुंबईतील नालेसफाईच्या कामांचा प्रत्यक्ष जागेवर जात आढावा घेतला. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले, दरवर्षी पावसाळ्यात मुंबईकरांना नाहक त्रास सहन करावा लागतो. यावर्षी त्यांना हा त्रास करावा लागू नये, म्हणून नाले सफाई चांगली झाली पाहिजे. नाल्यांचे खोलीकरण मोठ्या प्रमाणावर करा, असे निर्देश महापालिका प्रशासनाला दिले आहेत. किती मेट्रिक गाळ काढला यापेक्षा नाल्यांचे खोलीकरण कठीण खडक लागेपर्यंत करा. अशा सूचना दिल्या आहेत. जे अधिकारी चांगले काम करतील त्यांचा सन्मान केला जाईल. पण जे अधिकारी कर्तव्य पार पाडणार नाहीत. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला.

नाल्यांचे खोलीकरण झाल्यावर त्यांची वहन क्षमता वाढेल. त्याचबरोबर ज्याठिकाणी दरवर्षी पाणी साचते, त्यांची माहिती अधिकाऱ्यांना असते. त्यामुळे अशाजागी नोडल अधिकारी नेमून कंत्राटदाराकडून चांगल्या पद्धतीने काम करुन घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. वरळी येथील लव्हग्रोव्ह उदंचन केंद्राच्या ठिकाणी नाल्यांना फ्लड गेट लावण्यात आले आहेत. जेणेकरून भरतीच्यावेळी समुद्रातील पाणी नाल्यांमध्ये शिरणार नाही.

त्याचबरोबर फ्लड गेट आणि वेगाने पावसाचे पाणी समुद्रात फेकणाऱ्या पंपाची संख्या वाढवावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. रेल्वे हद्दीतील नाल्यांची देखील चांगल्या पद्धतीने सफाई झाली पाहिजे, जेणे करून रेल्वेरुळांवर पाणी साचणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी महापालिका प्रशासनाला दिले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm eknath shinde visit ongoing work of cleaning drains mumbai rain tumbai rmm