पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पावलावर पाऊल टाकत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बालदिनानिमित्त मुंबई महानगरपालिकेच्या ४८० शाळांमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे धडे दिले.
प्रत्येकाने वर्षांला शंभर तास म्हणजे आठवडय़ाला दोन तास स्वच्छतेसाठी दिले पाहिजेत. आपण जोवर तसेच कचरा करू नये व करू देऊ नये या धोरणाचा अवलंब करत नाही तोवर देश स्वच्छ होणार नाही असे फडणवीस यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. विलेपार्ले येथील माध्यमिक महापालिकेच्या शाळेत ‘बाल स्वच्छता अभियाना’चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आभासी वर्गाच्या माध्यमातून पालिकेच्या ४८० शाळांमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ दिली. यानंतरच्या प्रश्नोत्तरांच्या तासात विद्यार्थ्यांच्या शंकाचे निरसन केले. तावडे यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे १० नियम सांगत राज्यशासनाकडे विद्यार्थ्यांसाठी अनेक योजना आहेत, पण त्या योजना विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. यावेळी खासदार पूनम महाजन यांनी महिला सक्षमीकरणावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला.