भाजप-शिवसेनेत मुख्यमंत्रीपदावरुन दावे-प्रतिदावे सुरू असले तरी मुख्यमंत्रीपदाचे सूत्रच अजून ठरलेले नाही, असे परखड मतप्रदर्शन विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केले. त्यामुळे मुख्यमंत्री कोणाचा हा वाद घालण्यात अर्थ नसून तो महायुतीचाच असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. तावडे यांच्या या मतप्रदर्शनामुळे युतीमध्ये नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत.
महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार आणण्याचे आवाहन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केल्याने आता राज्यात शिवसेना मोठा भाऊ आणि भाजप लहान भाऊ ही संकल्पना मोडीत काढली जाणार आहे. भाजपची ताकद वाढल्याने आता जागावाटपात बरोबरीचा दावा करून मुख्यमंत्रीपद काबीज करण्यासाठी शिवसेनेवर कुरघोडी करण्याची रणनीती भाजपकडून आखली जात आहे.
लोकसभेसाठी भाजप मोठा भाऊ व शिवसेना लहान भाऊ आणि विधानसभेसाठी शिवसेना मोठा भाऊ व भाजप लहान भाऊ असे युतीचे समीकरण आहे. मात्र लोकसभेत घवघवीत यश मिळाल्यानंतर भाजपची महत्वाकांक्षा वाढली असून पक्षाची ताकद अधिकाधिक वाढवून भाजपच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. शहा यांनी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर कार्यकर्त्यांना तीच दिशा दिली आणि त्यामुळे शिवसेनेत मात्र अस्वस्थता निर्माण झाली आहे. तावडे यांना यासंदर्भात विचारता त्यांनी मुख्यमंत्रीपदाचे यावेळचे सूत्रच ठरले नसल्याचे सांगितले.
काय असेल चित्र?
शिवसेना नेत्यांना उद्धव ठाकरे तर भाजप नेत्यांना भाजपचा मुख्यमंत्री व्हावा, असे वाटत आहे. ज्याच्या जास्त जागा त्या पक्षाचा मुख्यमंत्री, अडीच-अडीच वष्रे दोघांचा मुख्यमंत्री किंवा एका पक्षाकडे मुख्यमंत्रीपद आणि दुसऱ्याकडे महत्वाची खाती, अशी तीन सूत्रे याआधी होती. त्यापकी एक किंवा नवीन कोणत्याही सूत्रानुसार मुख्यमंत्री ठरविला जाऊ शकतो, असे तावडे यांनी स्पष्ट केले.  गेल्या वेळी भाजपने ११७ व शिवसेनेने १७१ जागा लढविल्या होत्या. यंदा जागावाटपात किमान निम्म्या जागा मिळविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यामुळे महायुतीतील मित्रपक्षांसाठी जागा सोडता येतील आणि शिवसेनेहून अधिक जागा निवडून आणता येतील, असा भाजपचा प्रयत्न आहे. मात्र जागा वाढवून देण्याची शिवसेनेची तयारी नाही.

Story img Loader