सत्ताधारी- विरोधकांचे सूर कसे जुळले?
हुसेन दलवाई यांना राज्यसभेवर पाठवून विधान परिषदेची पोटनिवडणूक लादण्याचा काँग्रेस पक्षश्रेष्ठींचा डाव अंगलट येण्याची भीती होती, पण राष्ट्रवादीची मिळालेली साथ आणि विरोधकांचा पाठिंबा मिळविण्यात आलेल्या यशामुळे ही पोटनिवडणूक बिनविरोध पार पाडण्यात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज यशस्वी झाले. राज्यसभेपाठोपाठ विधान परिषदेचीही पोटनिवडणूक बिनविरोध पार पडल्याने सत्ताधारी आणि विरोधकांचे सूर एवढे कसे जुळले याचीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचे सय्यद मुझ्झफर हुसेन यांचा एकच अर्ज आल्याने त्यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग विनासायास मोकळा झाला. २०१० मध्ये विधान परिषदेवर निवड झालेल्या हुसेन दलवाई यांना २०११ मध्ये राज्यसभेवर पाठविण्यात आले. या रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोटनिवडणूक झाली. विधान परिषदेसाठी गुप्त मतदान होते. राष्ट्रवादीबरोबर वाढलेली कटुता, काँग्रेससोबतच्या अपक्ष आमदारांमधील वाढती अस्वस्थता व काँग्रेस आमदारांची चलबिचल यामुळे काँग्रेसचा उमेदवार अडचणीत येण्याची शक्यता होती. विधानसभेच्या चंदगड पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीला काँग्रेसच्या मदतीची गरज आहे. यामुळे राष्ट्रवादीने आघाडीचा धर्म पाळला. राष्ट्रवादीकडून काही मदत होणार नाही हे लक्षात येताच भाजप, शिवसेना या विरोधकांनी तलवारी म्यान केल्या.
गेल्याच महिन्यात झालेली राज्यसभेची पोटनिवडणूक बिनविरोध झाली होती. यापूर्वी मुख्यमंत्री चव्हाण यांची विधान परिषदेची पोटनिवडणूक बिनविरोध झाली होती. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एवढे सूत कसे जमले याचीच चर्चा सुरू झाली. शिवाजी पार्क मैदानात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिरवळीच्या स्वरूपात स्मारक उभारण्यास मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना दिलेली परवानगी यामागे या पोटनिवडणुकीचा काही संबंध नाही ना, ही कुजबूजही सुरू झाली. यशाची संधी नसली तरी विरोधकांनी उमेदवारच उभा न करता काँग्रेस किंवा मुख्यमंत्री चव्हाण यांना एवढा दिलासा देण्यामागचे कारण काय असेल यावरही तर्कवितर्क सुरू झाले.
मुझ्झफर हुसेन ८८ कोटींचे धनी
मीरा-भाईंदरमध्ये साम्राज्य उभारलेल्या मुझ्झफर हुसेन यांनी ८८ कोटींची स्थावर व जंगम मालमत्ता असल्याची माहिती प्रतिज्ञापत्रात सादर केली आहे. हुसेन यांच्या नावे ५७ कोटींची जंगम तर १९ कोटींची स्थावर मालमत्ता आहे. बाकीची मालमत्ता पत्नी व चार मुलांच्या नावे आहे. हुसेन यांच्या नावे एकच ट्रॅक्टर असून, एकही गाडी त्यांच्या नावावर नाही. त्यांच्या कुटुंबियांकडे सुमारे ५० लाख रुपयांचे दागिने आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आणि मुलीचे लग्न एकाच वेळी आल्याने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी हुसेन हे भाईंदरहून खास हेलिकॉप्टरने मुंबईत धडकले. मात्र त्यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागली.

Story img Loader