मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्र कळलाच नाही या शिवसेनेच्या भूमिकेशी काँग्रेसने सहमती दर्शवित, अशा मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये राहता कशाला, असा सवाल सेनेला केला आहे.

पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री कसुरी यांच्या कार्यक्रमाला शिवसेनेने विरोध केल्याने जगभरात महाराष्ट्राबद्दल वाईट मत तयार झाल्याचे मत मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र कळलाच नाही, असे प्रत्युत्तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिले आहे. मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र कळला नाही ही शिवसेनेची भूमिका १०० टक्के बरोबर असल्याचे मत काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केले.

गेल्या वर्षभरात मुख्यमंत्र्यांनी चाचपडत कारभार केला आहे. शिवसेनेवर कुरघोडी करण्याची अजिबात संधी त्यांनी सोडली नाही. महाराष्ट्र न कळलेल्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये शिवसेना का कायम राहते, असा सवाल करीत माणिकराव ठाकरे यांनी, शिवसेनेने खरे तर कठोर भूमिका घ्यायला हवी, असे मत व्यक्त केले.

गेल्या वर्षभरात सरकार किंवा मुख्यमंत्री फडणवीस हे प्रभाव पाडू शकलेले नाहीत. सरकार सर्व आघाडय़ांवर अयशस्वी ठरले आहे. विरोधात असताना फडणवीस मोठमोठय़ाने भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलत असत. पण त्यांच्या सरकारमधील मंत्र्यांवर आरोप झाल्यावर चौकशी पूर्ण होण्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी या मंत्र्यांना क्लीनचिट दिली, असेही ठाकरे यांनी म्हटले आहे.

 

Story img Loader