नाशिक येथे भरणाऱ्या कुंभमेळ्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेतला आहे, परंतु त्या प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारीची दखल घेऊन गृह खात्याच्या अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीमार्फत त्याची चौकशी केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
विधान परिषदेत बुधवारी प्रश्नोत्तराच्या तासात जयंत जाधव, धनंजय मुंडे, हेमंत टकले, आदी सदस्यांनी कुंभमेळ्यासाठी शासनाने काय काय तयारी केली आहे, अशी विचारणा केली. कुंभमेळ्यासाठी सुरक्षेचा भाग म्हणून संपूर्ण शहरात तात्पुरत्या स्वरूपात सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. मात्र सीसीटीव्ही बसवण्याबाबतच्या प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे, त्याची चौकशी करणार का, असा प्रश्न या सदस्यांनी विचारला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणा केली.
कुंभमेळ्यासाठी विविध पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, त्यासाठी राज्य सरकारने २ हजार ६२४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यानुसार बरीच कामे प्रगतिपथावर आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

Story img Loader