लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : म्हाडाचे गृहनिर्माण प्रकल्प, म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास प्रकल्प आणि उपकरप्राप्त इमारतींचे पुनर्विकास प्रकल्प वेळेत पूर्ण करून घ्या. प्रकल्प वेळेत पूर्ण करणारे विकासकांना, कंत्राटदारांना बक्षीस द्या आणि प्रकल्प वेळेत पूर्ण न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हाडाला दिले.

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ३०३३ घरांसाठी शनिवारी ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृहात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोडत काढण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या सोडतीला गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल, कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी मारोती मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

आणखी वाचा-मुंबईतील प्रमुख उड्डाणपुलांना बोगनवेलचा साज

कोकण मंडळाच्या ५३११ घरांची सोडत मागील तीन महिन्यांपासून रखडली होती. अखेर सोडतीसाठी मुख्यमंत्र्यांनी वेळ दिली आणि शनिवारी ३०३३ घरांच्या सोडतीचा निकाल जाहीर करण्यात आला. ५३११ घरांच्या सोडतीतील विरार-बोळींजमधील २२७८ घरे वगळत ३०३३ घरांसाठी शनिवारी सोडत काढण्यात आली.

या सोडतीत २४ हजार अर्जदार सहभागी झाले होते. त्यानुसार तीन हजार जणांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण झाले. विरार – बोळींजमधील २७२ विजेत्यांना यावेळी देकार पत्र वितरीत करण्यात आले. म्हाडाने आतापर्यंत नऊ लाख कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण केले आहे. आजही म्हाडाच्या घरांसाठी मोठ्या संख्येने अर्ज दाखल होत असून पारदर्शकपणे सोडत काढली जात आहे. यातून सर्वसामान्यांचा म्हाडावरील विश्वास दिवसेंदिवस वाढत चालला असल्याचे स्पष्ट होत आहे, असे एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. तर सर्वसामान्यांना, गिरणी कामगारांना घरे देण्यासाठी आमचे सरकार कटीबद्ध असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

आणखी वाचा-पाकिस्तान सुपर लीगच्या सामन्यांवर सट्टेबाजी, चौघांना अटक

सर्वसामान्यांसाठी अधिकाधिक परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याचा म्हाडाचा प्रयत्न आहे. यासाठी घरांची संख्या वाढविणे आणि प्रत्येक मंडळाची दरवर्षी एक तरी सोडत काढणे हे आम्ही उद्दीष्ट ठेवले आहे. त्यानुसार विविध मंडळाकडून सोडत काढण्यात येत आहेत. आज कोकण मंडळाची सोडत जाहीर झाली आहे. आता या वर्षात मुंबईकर आणि ठाणेकरांसाठी कोकण मंडळ, तसेच मुंबई मंडळातील घरांसाठी सोडत काढण्याचा प्रयत्न असेल, अशी माहिती म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दिली.

हास्यजत्रेतील कलाकार दत्तू मोरेचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण

मी सध्या ठाण्यात चाळीत रहातो. माझे स्वत:चे हक्काचे घर असावे असे स्वप्न होते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. पण घरांच्या किंमती पाहता म्हाडाच्या माध्यमातूनच आपले हे स्वप्न पूर्ण होऊ शकते हे लक्षात आले आणि मी म्हाडाच्या ठाण्यातील २० टक्के योजनेतील घरासाठी अर्ज केला. याआधी मुंबईच्या सोडतीत मी अर्ज करण्याचा प्रयत्न केला. पण कागदपत्रांची पूर्तता करू न शकल्याने सोडतीत सहभागी होता आले नाही. पण आता अर्ज केला आणि विजेताही ठरलो. माझे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण झाल्याने खूप आनंद होत आहे. -दत्तू मोरे, अभिनेता

मी १९९३ पासून म्हाडा भवनातील उपहारगृहात वेटर म्हणून काम करतो. म्हाडाने आतापर्यंत अनेकांना घरे दिली. तेव्हा आपणही अर्ज भरुन बघू या म्हणून मी अर्ज भरला आणि मला आज घर लागले. आतापर्यंत मी बदलापूरला भाड्याच्या घरात राहत होते. आता मात्र लवकरच मी हक्काच्या घरात जाईन, याचा खूप आनंद होत आहे. -सत्यप्पा पवार, विजेते

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm order to mhada take action against developers contractors who do not complete housing projects on time mumbai print news mrj
Show comments