राजकारणासाठी भारतीय पोलीस सेवेचा राजीनामा देऊन बाहेर पडणाऱ्या सत्यपाल सिंह यांचा जाता जाता पोलीस महासंचालक म्हणून बढती घेण्याचा डाव मात्र फसला. राजीनामा मंजूर होण्याच्या आधीच राजकीय विधाने केल्याबद्दल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही त्यांची कानउघाडणी केल्याचे समजते. त्यामुळेच त्यांचा राजीनामाही तडकाफडकी मंजूर करण्यात आल्याचे सांगण्यात आले. बढतीपात्र झाल्यानंतरही सिंह आयुक्तपदाला चिकटून राहिल्यामुळे अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या रखडल्याबद्दल आयपीएस लॉबीमध्येही संताप आहे.
भाजपमध्ये जाऊन लोकसभा निवडणुका लढविण्यासाठी सत्यपाल सिंह यांनी २९ जानेवारीला गृह विभागाकडे राजीनामा दाखल केला. परंतु त्यांचा अर्ज मंजूर होऊन त्यांना सेवामुक्त करण्याच्या आधीच त्यांनी प्रसार माध्यमांमधून त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा बोलून दाखवायला सुरुवात केल्यामुळे मुख्यमंत्री त्यांच्यावर संतापले होते. पोलीस दलातून मुक्त होऊन राजकारणात प्रवेश करणार असल्याचे सांगण्यासाठी त्यांनी काही जवळच्या लोकांना खास पार्टी देण्याचे योजले होते. त्याची कुणकुण लागताच मुख्यमंत्र्यांनी त्यांची कानउघाडणी केल्याचे सांगण्यात येते. त्यामुळेच त्यांचा राजनामाही तडकाफडकी मंजूर करण्यात येऊन त्यांना पोलीस सेवेतून मुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु जाताजाताही त्यांचा बढती पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न होता. या संदर्भात गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव अमिताभ राजन यांना विचारले असता, बढतीची प्रक्रिया एका दिवसात होत नसते, त्यांना आहे त्याच पदावरुन सेवामुक्त करण्यात आले आहे आणि शनिवारीच तसा आदेश जारी करण्यात आल्याचे त्यांनी लोकसत्ताला सांगितले.
सत्यापाल सिंह यांची ऑगस्ट २०१२ मध्ये मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर मार्च २०१३ मध्ये ते अतिरिक्त पोलीस महासंचालकपदावरुन महासंचालकपदासाठी पात्र झाले होते. परंतु आयुक्तपदावरुन उचलबांगडी होईल म्हणून त्यांनी पदोन्नती नाकारल्याचे समजते. मात्र त्यामुळे बढती प्रक्रियाच थांबली गेल्याने त्याचा सुमारे दीडशे आयपीएस व इतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना फटका बसला. त्यामुळे सिंह यांनी राजकारणात जाण्याची केलेली विधाने, त्यासाठी त्यांचा स्वेच्छा निवृत्तीचा अर्ज तडकाफडकी मंजूर होणे, या साऱ्या प्रकाराने आयपीएस लॉबीतही संताप आहे. या संदर्भात एक वरिष्ठ आयपीएस अधिकारी संयय पांडे यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना पत्र पाठवून नाराजी व्यक्त केली आहे.
भाजपकडून उत्तरप्रदेशातून लढणार?
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त डॉ. सत्यपालसिंह भाजपमध्ये प्रवेश करणार असून त्यांना उत्तरप्रदेशातून लोकसभेची उमेदवारी दिली जाणार असल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. पोलिस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्याने मुंबई पोलिस आयुक्तपदासारख्या महत्वाच्या पदावर असताना सेवाचा राजीनामा देण्याची आणि राजकारणात प्रवेशाची राज्याच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. काही राजकीय पक्षांकडून आपल्याला ‘ऑफर’ असून त्याबाबत विचार सुरू आहे व लवकरच निर्णय घेतला जाईल, असे सत्यपालसिंह यांनी जाहीर केले आहे. त्यांच्या गेल्या काही दिवसांत भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्यांशी भेटीगाठी व चर्चा झाल्या आहेत. त्यांचा उत्तरप्रदेशातून निवडणूक लढविण्यासाठी विचार सुरू असल्याचे समजते. यासंदर्भातील निर्णय अध्यक्ष राजनाथसिंह यांच्याकडून लवकरच घेतला जाणार आहे, असे या सूत्रांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Feb 2014 रोजी प्रकाशित
बढती घेण्याचा सत्यपाल सिंह यांचा डाव फसला!
राजकारणासाठी भारतीय पोलीस सेवेचा राजीनामा देऊन बाहेर पडणाऱ्या सत्यपाल सिंह यांचा जाता जाता पोलीस महासंचालक म्हणून बढती घेण्याचा डाव मात्र फसला.
First published on: 02-02-2014 at 01:01 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm prithviraj chavan frown to satyapal singh