दोन हजापर्यंतच्या झोपडय़ा अधिकृत करण्याबाबत असलेल्या अडचणी आणि अडथळे दूर झाले असून याबाबतचा निर्णय लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी मुंबईत चेंबूर येथे केली. तर केंद्र शासनाला दरवर्षी मुंबईतून खूप मोठा महसूल मिळतो. त्यामुळे मुंबईतील विविध विकास कामांसाठी केंद्रीय वित्त आयोगाकडून मुंबईला १२ हजार ४४७ कोटी रुपये आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी राज्याच्या दौऱ्यावर आलेल्या वित्त आयोगाच्या अध्यक्षांकडे केली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या वेळी दिली. मोनो रेल प्रकल्पाच्या उद्घाटनानंतर चेंबूर येथील गांधी मैदानात आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.
मोनोच्या जाहीर सभेतील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अन्य भाषणे म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकीच्या काँग्रेस आघाडी शासनाच्या निवडणूक प्रचाराचे रणशिंग ठरले. आघाडी शासनाने मुंबईसह राज्यात कोणती कामे केली आणि कोणती कामे हाती घेतली आहेत, त्याचा पाढा या सर्वानी वाचला. मोनो रेल प्रकल्प हा मुंबईचा मानबिंदू असून ती या शहराची नवी ओळख आहे. या मोनो रेलमुळे मुंबईला आंतरराष्ट्रीय स्तरावरही वेगळी ओळख मिळाली आहे. मोनो रेलचा परिसर, रेल्वे स्थानके आणि हा गाडी स्वच्छ ठेवण्याचा सर्वानी प्रयत्न करावा, असे सांगून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, मेट्रो प्रकल्पाच्याही चाचण्या गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याला सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच ही सेवा सुरू केली जाईल. मार्च २०१४ पर्यंत मेट्रो प्रकल्पाचा पहिला टप्पा सुरू होईल.
राज्यातील आघाडी शासन मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी वेगाने प्रयत्न करीत आहे. कोणी काही म्हणत असले किंवा अन्य राज्ये आम्हीच पुढे असल्याचा दावा करीत असले तरीही विविध प्रकल्प आणि गुंतवणूक करण्यासाठी परदेशीकंपन्यांची आजही पहिली पसंती महाराष्ट्रच आहे. महाराष्ट्र राज्य हे प्रथम क्रमांकावर असल्याचा दावा करून राज्यातील नव्या ३६ विशाल प्रकल्पांचे ‘एमओयू’ लवकरच केले जाणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
या वेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, गेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबईकरांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहा खासदारांना निवडून देऊन आमच्यावर विश्वास टाकला. राज्यातील आघाडी शासनाने मुंबईसह राज्यात गेल्या काही वर्षांत २० हजार कोटींची कामे केली असून ३० हजार कोटी रुपयांची कामे प्रस्तावित आहेत. तर दोन लाख कोटी रुपयांची कामे केंद्र शासन आणि मुंबई महानगर विकास प्राधिकरणाकडून मुंबईकरांसाठी आघाडी शासनाकडून केली जाणार आहेत. विरोधक आमच्यावर खोटे आरोप करून नागरिकांची दिशाभूल करीत आहेत.
या वेळी मुंबईचे पालकमंत्री आणि ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, माजी महापौर आणि आमदार चंद्रकांत हंडोरे, नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांचीही भाषणे झाली. प्राधिकरणाचे महानगर आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी प्रास्ताविक तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप भिडे यांनी केले. महापौर सुनील प्रभू यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील अन्य मंत्री, खासदार या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
*मेट्रो-३ या भूमिगत रेल्वे प्रकल्पाचे भूमिपूजन लवकरच, २४ हजार कोटींचा हा प्रकल्प
*सांताक्रूझ-चेंबूर जोडरस्त्याचे काम जोरात सुरू
*अमर महाल जंक्शन उड्डाणपूलही लवकरच खुला
दोन हजापर्यंतच्या झोपडय़ा अधिकृत?
दोन हजापर्यंतच्या झोपडय़ा अधिकृत करण्याबाबत असलेल्या अडचणी आणि अडथळे दूर झाले असून याबाबतचा निर्णय लवकरच जाहीर करण्यात येईल
First published on: 02-02-2014 at 03:26 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm prithviraj chavan provokes election campaigning in monorail program