नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे जुल-ऑगस्ट २०१५ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी पायाभूत सुविधांची कामे करण्यासाठी २३८० कोटींच्या आराखडय़ास गुरुवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मान्यता दिली. त्याचप्रमाणे सिंहस्थासाठीची सर्व कामे अत्याधुनिक तंत्राचा वापर करून ३१ मार्च २०१५ पूर्वी पूर्ण करावीत, असे आदेशही चव्हाण यांनी यावेळी दिले. या कुंभमेळ्यासाठी साधुग्राम निर्माण करण्यासाठी जमीन संपादित करण्यासाठी सिंहस्थ टीडीआर ही विशेष सवलत योजना लागू करण्याचाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला. राज्याचे शिष्टमंडळ लवकरच पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची भेट घेणार असून केंद्र सरकारने यासाठी भरीव निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करणार आहे.
कुंभमेळा आयोजनासाठी नेमलेल्या शिखर समितीची बठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बठकीला नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री आर. आर. पाटील, आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांच्यासह नाशिकचे लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते.
 या कुंभमेळ्यासाठी साधू व भाविक मिळून एक कोटी लोक येतील, असा अंदाज आहे. या दृष्टीने शाही स्नान परिसरातील कामे, पाणीपुरवठा योजना, रस्ते व पूल, मलनिस्सारण, कायमस्वरूपी शौचालये, विद्युत व्यवस्था आदी सोयी सुविधांची मोठय़ा प्रमाणात उभारणी करावी लागणार आहे. साधूग्रामची उभारणी करण्याबाबत तसेच सर्व धार्मिक कार्यक्रमांबाबत शैव आणि वैष्णव आखाडे आणि प्रशासन यांचा समन्वय ठेवण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येणार असून नियंत्रण कक्षातून सर्व सोहळ्यावर नजर ठेवली जाणार आहे.
 येत्या शनिवारी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांची वेळ मागितली आहे. ही भेट झाली तर या संदर्भातील प्राथमिक स्वरूपाचे पत्र त्यांना देऊन केंद्र सरकारकडून जास्तीत जास्त निधी देण्याची विनंती करणार आहे. त्यानंतर विस्तृत प्रकल्प अहवालासह अंतिम प्रस्ताव तयार करून तो घेऊन ज्येष्ठ मंत्र्यांसमवेत पुन्हा पंतप्रधानांना भेटणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
कुंभमेळ्याचा कार्यक्रम जाहीर
अखिल भारतीय आखाडा परिषद आणि पुरोहित संघाने २०१५-१६ मध्ये नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या तारखा पुढीलप्रमाणे जाहिर केल्या आहेत. ध्वजपर्व प्रारंभ-१४ जुलै २०१५, आखाडा ध्वजारोहण १९ ऑगस्ट २०१५, ध्वजपर्व शेवट -११ ऑगस्ट २०१६. तसेच नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे पहिले शाही स्नान २९ ऑगस्ट २०१५ रोजी, दुसरे शाही स्नान १३सप्टेंबर २०१५ रोजी तर तिसरे शाही स्नान २५ सप्टेंबर २०१५ रोजी होणार आहे.

Story img Loader