मंत्रालयाचा ‘कॉर्पोरेट ऑफिस’ मध्ये ‘मेकओव्हर’ करायला निघालेल्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना आता समुद्र नजरेसमोर हवा आहे. मंत्रालयाची दुरवस्था पाहून तेथे येणे-जाणे टाळलेल्या मुख्यमंत्र्यांचे त्यानिमित्ताने बुधवारी मंत्रालयात आगमन झाले.
 मंत्रालयाची आणि सहाव्या मजल्यावरील आपल्या नवीन दालनांची त्यांनी पाहणी केली. मात्र समुद्राचे विहंगम दृश्य नीट दिसावे, असा त्यांचा आग्रह आहे. मंत्रालयातील दुरूस्तीकामांमुळे आवाज, घाण, धूळ, रसायनांचा वास यामुळे काम करणे कठीण बनल्याने मुख्यमंत्री शक्यतो विधानभवन किंवा सह्य़ाद्री अतिथीगृहातून काम पहात होते. मंत्रालयात येणे त्यांनी कमी केले होते. मुख्यमंत्र्यांच्या सहाव्या मजल्यावरील कार्यालयाच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण होत असल्याने आणि स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येनिमित्ताने मुख्यमंत्री चव्हाण बुधवारी मंत्रालयात आले. त्यांनी सहाव्या मजल्यावरील आपल्या नवीन दालनांची पाहणी केली. त्यांच्या दालनात तीन छोटय़ा खिडक्या आहेत. त्यामुळे समुद्रदर्शन नीट होऊ शकत नाही. त्यामुळे त्याऐवजी भलीमोठी काचेची खिडकी बसवावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले. आता सुरक्षेच्या कारणामुळे ही काच बुलेटप्रूफ बसवावी लागणार आहे.
दरम्यान, स्वातंत्र्यदिनानिमित्ताने मुख्य इमारतीतील व आवारातील कचरा साफसफाई करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मुख्य आणि अ‍ॅनेक्स इमारतीतील गैरसुविधा तशाच ठेवून दर्शनी भागात मुख्य इमारतीची रंगसफेती करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा