लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर अर्थसहाय्य दिले जाते. मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाने मार्चमध्ये तब्बल २ हजार ५१७ रुग्णांना २२ कोटी रुपयांहून अधिकची मदत केली आहे. सर्वाधिक मदत मेंदू विकार झालेल्या रुग्णांवरील उपचारांसाठी करण्यात आल्याची माहिती कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातून विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना आर्थिक मदत करण्यात येत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष अहोरात्र कार्यरत आहे. या कक्षातर्फे मार्चमध्ये २ हजार ५१७ रुग्णांना आर्थिक मदत केली. यामध्ये सर्वाधिक रुग्ण मेंदू विकाराचे आहे. मार्चमध्ये करण्यात आलेली मदत मागील तीन महिन्यांच्या तुलनेत अधिक आहे, अशी माहिती रामेश्वर नाईक यांनी दिली.

मेंदू विकारांवरील उपचारांसाठी सर्वाधिक मदत

मेंदू विकार झालेल्या ४७१ रुग्णांना उपचारासाठी आर्थिक मदत करण्यात आली. तसेच कर्करोगावरील उपचारांसाठी ४२१ रुग्णांना, हिप रिप्लेसमेंटसाठी ३०६ रुग्णांना, अपघातामधील शस्त्रक्रियेसाठी २४७ रुग्णांना, हृदय विकारांवरील उपचारांसाठी २३९ रुग्णांना, अपघाता संबंधित १८४ रुग्णांना, गुडघा प्रत्यारोपणासाठी १५० रुग्णांना, बाल रोगांवरील उपचारांसाठी १४५ रुग्णांना आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात आले.

मागील तीन महिन्यांत ५ हजार रुग्णांना मदतीचा हात

डिसेंबर २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या तीन महिन्यांच्या कालावधीत ५ हजार २५० रुग्णांना आर्थिक मदतीचे वितरण मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या माध्यमातून करण्यात आले. डिसेंबर २०२४ मध्ये १३९२ रुग्णांना १२ कोटी २१ लाख रुपये, जानेवारी २०२५ मध्ये १७८८ रुग्णांना १५ कोटी ८१ लाख २७ हजार रुपये, तर, फेब्रुवारी २०२५ मध्ये २०७३ रुग्णांना १८ कोटी ३४ लाख ६६ हजार रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत देण्यात आली.

अधिकाधिक गरजूंच्या मदतीसाठी समाजाने पुढाकार घ्यावा

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातून अधिकाधिक गरजू रुग्णांना आर्थिक मदत करण्यात येत आहे. समाजातील दानशुर व्यक्तींनीही मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षास सढळ हाताने मदत करावी, जेणेकरून मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून अधिकाधिक रुग्णांना आर्थिक मदत करता येईल. राज्यातील गरजू रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांनी या सुविधेचा लाभ घ्यावा. तसेच, या कक्षाद्वारे देण्यात येणाऱ्या मदतीची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी समाजातील संवेदनशील घटकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन रामेश्वर नाईक यांनी केले आहे.