मुंबई : राज्यातील गरीब व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष ‘जीवनदायी’ ठरत आहे. मागील तीन महिन्यांत मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षचा मदतीचा आलेख उंचावला असून तब्बल ५ हजार २५० रुग्णांना ४६ कोटी ३७ लाख ५० हजार रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आल्याची माहिती कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली.

राज्यातील कोणत्याही गरजू रुग्णाला आर्थिक अडचणींमुळे उपचारांपासून वंचित राहू द्यायचे नाही, या उद्देशाने मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष कार्यरत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता आणण्यासाठी प्राधान्य देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांना तातडीने आणि अधिकाधिक मदत मिळावी यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात येत आहेत. या कक्षांच्या माध्यमातून विविध आजारांवरील उपचारांसाठी गरजू रुग्णांना आर्थिक सहाय्य केले जाते.

याच धर्तीवर मुख्यमंत्री सहायता व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या माध्यमातून गरीब रुग्णांना वैद्यकीय उपचारांसाठी मोठा आधार मिळत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष अहोरात्र कार्यरत आहे. यामुळेच राज्यभरातील गरीब रूग्णांना केल्या जाणाऱ्या मदतीचा आलेख दिवसेंदिवस उंचावत आहे.

डिसेंबर २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या तीन महिन्यांच्या कालावधीत मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातून ५ हजार २५० रुग्णांना ४६ कोटी ३७ लाख ५० हजार रुपये आर्थिक मदतीचे वितरण करण्यात आले आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याची माहिती रामेश्वर नाईक यांनी दिली.

कक्षाकडून केलेल्या मदतीचा तपशील

डिसेंबर २०२४ मध्ये १ हजार ३९२ रुग्णांना १२ कोटी २१ लाख रुपये इतकी मदत करण्यात आली. त्यानंतर जानेवारी २०२५ मध्ये १ हजार ७८८ रुग्णांना १५ कोटी ८१ लाख २७ हजार रुपये आणि फेब्रुवारी २०२५ मध्ये २ हजार ७३ रुग्णांना १८ कोटी ३४ लाख ६६ हजार रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत देण्यात आली. ही मदत केवळ आकड्यांपूर्ती मर्यादित नसून अनेक रुग्णांना आणि रुग्णांच्या नातेवाईकांना भरीव आधार मिळत असल्याचे समाधान नातेवाईकांतून व्यक्त होत आहे.

गरजू उपचारापासून वंचित राहू नये

राज्यातील कोणत्याही गरजू रुग्णाला आर्थिक अडचणींमुळे उपचारांपासून वंचित राहू द्यायचे नाही, या उद्देशाने मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष कार्यरत आहे. भविष्यातही गरजू रुग्णांसाठी अधिक मदत आणि तत्पर सेवा पुरवण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष कटिबद्ध राहील, असा विश्वास रामेश्वर नाईक यांनी व्यक्त केला.

कशी मिळवू शकता मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळवण्यासाठी मुंबईत मंत्रालयात येण्याची आवश्यकता नाही. सहायता कक्षातील मदत क्रमांक ८६५०५६७५६७ वर दूरध्वनी करणाऱ्याला थेट मोबाइलवर अर्ज उपलब्ध करून दिला जात आहे. तसेच राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्षास अर्जासह कागदपत्रे charityhelp.dcmo @maharashtra.gov.in या ई-मेल आयडीवर मेल करू शकतात किंवा प्रत्यक्ष कक्षात आणून देवू शकतात, अशी माहिती रामेश्वर नाईक यांनी दिली.