राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांच्या निधनावर शोक व्यक्त केलाय. सिंधुताईंच्या निधनाची बातमी धक्कादायक असल्याचं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. अजित पवार यांनी समाजातील हजारो अनाथांच्या डोक्यावर मायेची पखरण करणारं मातृछत्र हरपलं, असं म्हणत आपलं दुःख व्यक्त केलं.
“आईच्या ममतेनं हजारो अनाथांचा सांभाळ करणारी ती मातृदेवताच”
उद्धव ठाकरे म्हणाले, “सिंधुताईंच्या निधनाची बातमी धक्कादायक आहे. आईच्या ममतेनं हजारो अनाथांचा सांभाळ करणारी ती मातृदेवताच होती. त्यांच्या अचानक जाण्यानं समाजसेवेतील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्यातून हरपले आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री सिंधुताईंना भावपूर्ण श्रद्धांजली.”
“सिंधुताईंच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्राची मोठी हानी”
अजित पवार म्हणाले, “ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या निधनामुळे समाजातील अनाथांच्या डोक्यावर मायेचे मातृछत्र धरणारी माय हरपली आहे. समाजातील हजारो अनाथ मुला-मुलींचा सांभाळ करुन त्यांच्यावर मायेची पखरण करणाऱ्या सिंधुताईंच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.”
“सिंधुताईंच्या निधनाने हजारो अनाथांचे मातृछत्र हरपलं”
“सिंधुताई सपकाळ यांनी समाजातल्या हजारो अनाथ मुला-मुलींचा सांभाळ केला. त्यांना शिक्षण देऊन आपल्या पायावर उभे केले. त्यांना मायेची सावली दिली. महिलांच्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचे काम करत त्यांनी त्यांच्या सामाजिक कार्याला सुरुवात केली. आयुष्यभर संघर्ष, कष्ट करत त्यांनी सामाजिक कामाचा वसा जपला. त्यांच्या समाजकार्याची दखल घेऊन त्यांना नुकतेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. सिंधुताईंच्या निधनाने हजारो अनाथांचे मातृछत्र हरपलं आहे,” अशा शब्दात अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
हेही वाचा : Video: ‘चिंधी’ ते पद्मश्री पटकावणारी अनाथांची माय… असा होता सिंधुताई सपकाळ यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची सिंधुताई सपकाळ यांना श्रद्धांजली
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, “निराधारांचा आधार आणि अनाथांची आई बनून समाजासाठी प्रेरणास्रोत ठरलेल्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे आकस्मिक निधन अतिशय दुःखदायक आहे. त्यांनी वात्सल्याची पाखर घालून मुख्य प्रवाहात आणलेल्या हजारो मुलांच्या आयुष्यातील प्रकाश बनून त्या नेहमी उजळत राहतील.”