मुख्यमंत्र्यांची घोषणा; आठवड्याभराने आढावा घेऊन टाळेबंदीबाबत निर्णय

मुंबई : राज्यातील वाढता करोना संसर्ग रोखण्यासाठी सर्व प्रकारचे सार्वजनिक कार्यक्रम आणि आंदोलनांवर सोमवारपासून काही दिवस बंदी घालण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी केली. रुग्णवाढीची आकडेवारी आणि नागरिक शिस्तपालन करतात की नाही, हे तपासून टाळेबंदी लागू करण्याबाबत आठ-दहा दिवसांनी निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढत असून राजकीय, सामाजिक, धार्मिक अशा कार्यक्रमांना परवानगी मिळणार नाही. नियम न पाळणारी मंगल कार्यालये, सभागृहे, उपाहारगृहे यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. मुखपट्टी वापरा, शिस्त पाळा आणि टाळेबंदी टाळा ही त्रिसूत्री पाळा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. रुग्णसंख्या अधिक असलेल्या जिल्ह्यांमध्ये सोमवारपासून कठोर निर्बंध किंवा अशंत: टाळेबंदी लागू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सर्व शासकीय समारंभ गर्दी टाळून आणि शक्यतो दूरचित्रसंवाद माध्यमातून करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्या दोन-अडीच हजारांवरून अनेक पटींनी वाढून रविवारी सात हजारांवर पोहोचली. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक नागरिकांनी करोनाची साथ गेली, असे समजून मुखपट्टीचा वापर बंद केला होता. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. विवाह आणि अन्य समारंभ आयोजित केले गेले. मंदिरे आणि अन्य धार्मिक कार्यक्रम घेतले गेले. राजकीय मेळावे, सभा, आंदोलने यामध्ये करोनाविषयक नियमांचे पालन झाले नाही. त्यामुळे अनेक पटींनी रुग्णवाढ होत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

अमरावतीसारख्या ठिकाणी सर्वाधिक रुग्णवाढीचा याआधीचा टप्पा ओलांडला गेला आहे. ही दुसरी लाट आहे का हे काही दिवसांमध्ये समजेल. पण पाश्चाात्य देशांप्रमाणे राज्यातही निर्बंध पाळण्याबाबत शिथिलता आल्याने हे घडले आहे. ब्रिटन, ब्राझील या देशांमध्ये पुन्हा टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. राज्यात हे टाळायचे असेल, तर पुढील काळात मुखपट्टीचा वापर आणि इतर नियमांचे काटेकोर पालन करावेच लागेल, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.

 

महाराष्ट्र थांबला नाही!

करोनाची जोरदार साथ असताना देखील महाराष्ट्र थांबला नाही. राज्यात दोन लाख कोटी रूपयांपर्यंत गुंतवणूक आणली. एमएमआरडीएच्या काही प्रकल्पांना सुरुवात झाली, पर्यटन, कृषी क्षेत्रासह विकासाची सर्व कामे सुरूच ठेवली. भूमिपूजने झाली, कृषी पंपांना वीज दिली, मी विदर्भ, मराठवाड्यात जाऊन आलो. जव्हारला भेट दिली. ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग’ १ मेपासून नागपूर-शिर्डी वाहतुकीस सुरु करीत आहोत. कामे थांबणार नाहीत, मात्र आता गर्दी करून कोणतेही कार्यक्रम होणार नाहीत, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

 

घरातूनच कामावर भर द्या!

उपनगरी रेल्वे गाड्या, बेस्ट बस आणि अन्य सार्वजनिक वाहतूक साधने, कार्यालये, हॉटेल्स यामधील गर्दी कमी करण्यासाठी कार्यालयीन वेळा बदलाव्यात आणि शक्यतो घरून काम करण्याची मुभा कर्मचाऱ्यांना द्यावी. कार्यालयात कमीतकमी कर्मचारी संख्या ठेवावी. त्यासाठी सर्वांना एकाच वेळी न बोलावता त्यांचे गट करून आलटून-पालटून बोलवावे, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी खासगी आस्थापना, उद्योगांना केले.

देशात १४,२६४ नवे रुग्ण

नवी दिल्ली : देशात पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली असून, गेल्या २४ तासांत १४,२६४ नवे बाधित आढळले. दिवसभरात ९० रुग्णांचा मृत्यू झाल्याने करोनाबळींची एकूण संख्या १,५६,३०२ वर पोहोचली आहे. देशभरात सध्या १,४५,६३४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एकूण रुग्णांच्या तुलनेत हे प्रमाण १.३२ टक्के आहे.

करोना प्रतिबंधासाठी ‘मी जबाबदार’ मोहीम

करोना नियंत्रणासाठी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम राबविण्यात आली होती. आता ‘मी जबाबदार’ ही नवी मोहीम सोमवारपासून राज्यात राबविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यात सात हजार नवे बाधित

’राज्यात गेल्या २४ तासांत ६,९७१ नवे रुग्ण,३५ जणांचा मृत्यू.  मुंबई दिवसभरात ९२१ जणांना लागण.

’नागपूर जिल्हा ७६०, अमरावती शहर ६६६, अकोला शहर १४५, बुलढाणा २१६, वाशिम १२६, वर्धा १२४ नवे रुग्ण.

विदर्भात…

अमरावती आणि अचलपूरमध्ये आज, सोमवारी सायंकाळपासून १ मार्चपर्यंत आठवडाभर टाळेबंदी.

’अकोला, अकोट आणि मूर्तिजापूर शहर प्रतिबंधित क्षेत्र, १ मार्चपर्यंत टाळेबंदी.

पुणे जिल्ह्यात…

’पुणे, पिंपरी-चिंचवडसह संपूर्ण जिल्ह्यात रात्री ११ ते सकाळी ६ संचारबंदी. हॉटेल, रेस्टॉरंट, मद्यालये रात्री ११ पर्यंतच.

राजकीय पक्षांनीही गर्दी करणारी आंदोलने, मोर्चे काढू नयेत. माझ्यासह महाविकास आघाडी आणि विरोधी पक्षांनाही पक्ष वाढवायचा आहे. पण हे करताना करोना संसर्ग वाढणार नाही, याची काळजी घ्यावी. – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

Story img Loader