मुंबईत मध्यरात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे चेंबूर आणि विक्रोळी येथे झालेल्या दुर्घटनेत झालेल्या मृत्यूंसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे. पालिका आयुक्तांकडून मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळी सुरू असलेल्या बचावकार्याची माहिती घेतली. एनडीआरएफ, महानगरपालिका, अग्निशामक दल आणि पोलीस यांनी समन्वयाने बचाव कार्य सुरु ठेवावे व जखमींना तातडीने रुग्णालयांत हलवून व्यवस्थित उपचार मिळतील याची व्यवस्था करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली असून जखमींवर मोफत उपचार केले जाणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिठी नदीलगतच्या रहिवाशांचं स्थलांतर?

मुंबईत रात्रभर पाऊस सुरु असून मुख्यमंत्री स्वत: पालिकेच्या नियंत्रण कक्षाकडून सातत्याने माहिती घेत असल्याचं राज्य सरकारकडून सांगण्यात आलं आहे. आजही पाउस सुरूच राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज असल्याने सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे व कुठेही दुर्घटना घडल्यास त्वरीत बचाव कार्य सुरु ठेवावे असेही त्यांनी निर्देश दिले आहेत. मुंबईतील मिठी नदी व इतर मोठ्या नाल्यांलगत पाणी वाढल्यास आसपास राहणाऱ्या रहिवाशांना मोठ्या प्रमाणावर त्रास होऊ शकतो, हे पाहून त्यांना प्रसंगी स्थलांतरित करावे. कोविड संसर्ग लक्षात घेऊन जम्बो केंद्रामधील रुग्ण तसेच इतर साधन सामुग्री यांची काळजी घ्यावी व सतर्क राहावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी मुंबई महानगर पालिकेस दिले आहेत.

पावसामुळे जिथे जिथे पाणी साचले आहे त्याठिकाणी पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा व्यवस्थित कार्यान्वित करावी, रस्ते मोकळे करावेत. वाहतुकीवर परिणाम झालेला आहे. मात्र लवकरात लवकर ती सुरळीत होईल असे पाहावे. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी देखील रेल्वे वाहतूक कशी पूर्ववत होईल यासाठी प्रयत्न करावेत, अशा सुचना मुख्यमंत्र्यांनी आज प्रशासनाला दिल्या.

केंद्रानंही जाहीर केली २ लाखांची मदत

मुंबईमध्ये शनिवारी मध्यरात्रीपासूच मुसळधार पावसानं हजेरी लावली होती. यामुळे अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणवार पाणी साचलं होतं. पावसामुळे मुंबईच्या चेंबूर आणि विक्रोळी दुर्घटनांमधील मृतांच्या नातेवाईकांना केंद्र सरकारने आर्थिक मदत जाहीर केली आहे. मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती निधीमधून २ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. त्यासोबतच, या दुर्घटनांमध्ये जखमी झालेल्या व्यक्तींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm uddhav thackeray announces 5 lakh each help to keen of people lost lives in chembur vikhroli incident pmw
Show comments