पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे आणि मुंबई दौऱ्यावर आहेत. पुण्यातील देहू याठिकाणी तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिरांचं लोकार्पण केल्यानंतर मोदी आपल्या हेलिकॉप्टरद्वारे मुंबईसाठी रवाना झाले. मुंबईतील आयएनएस शिक्रा पाँईटवर पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि आदित्य ठाकरे उपस्थित राहिले होते. यावेळी आदित्य ठाकरे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाहनातून शिक्रा पाँईटवर पोहोचले होते.
दरम्यान, सुरक्षा यंत्रणांनी आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्र्यांच्या गाडीतून खाली उतरवण्याचा प्रयत्न केला आहे. संबंधित प्रकार घडल्यानंतर उद्धव ठाकरे सुरक्षा यंत्रणांवर भडकल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नरेंद्र मोदी यांचं शिक्रा पाँईंटवर आगमन झाल्यानंतर, प्रोटोकॉलनुसार सुरक्षा यंत्रणांनी केवळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पुढे जाण्यास परवानगी दिली आणि आदित्य ठाकरे यांना वाहनातून खाली उतरवण्याचा प्रयत्न केला.
यावेळी उद्धव ठाकरे सुरक्षा यंत्रणांवर भडकले, त्यानंतर आदित्य ठाकरे यांना देखील पुढे प्रवेश देण्यात आला. पंतप्रधान मोदी आज मुंबईतील राज्यपालांचे कार्यालय व निवासस्थान असलेल्या ‘जलभूषण’ या नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीचे उद्घाटन व द्वारपूजन करणार आहेत. तसेच राजभवन येथील ऐतिहासिक श्रीगुंडी मंदिराला देखील ते प्रथमच भेट देणार आहेत.