“झुकेगा नहीं साला” म्हणत राणा दाम्पत्याला इशारा देणाऱ्या मुंबईतील ९२ वर्षीय आजीबाईंच्या भेटीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहकुटुंब त्यांच्या घरी गेले. यावेळी त्यांच्यासोबत रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे हेही उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी चंद्रभागा शिंदे या आजींची परळमधील दाभोळकर वाडीत त्यांच्या राहत्या घरी जाऊन भेट घेतली. तसेच तुम्हीच आमच्या घरी यायचं का असं म्हटलं. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत असताना मुख्यमंत्र्यांनी त्या कार्यक्रमाला गैरहजर राहत आजींची भेट घेतली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा या राणा दाम्पत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानासमोर जाऊन हनुमान चालिसा पठण करणार असल्याची घोषणा केली होती. यानंतर शिवसेना कार्यकर्ते कमालीचे आक्रमक झाले आहेत. मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज्य सरकारच्या भूमिकेला विरोध करण्यासाठी राणा दाम्पत्याने थेट मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा दिला होता. यानंतर अनेक शिवसैनिकांसह ९२ वर्षांच्या चंद्रभागा आजी देखील मातोश्रीबाहेर थांबल्या. तसेच त्यांनी थेट राणा दाम्पत्याविरोधात घोषणाबाजी करत ‘पुष्पा’ स्टाईलमध्ये “झुकेगा नहीं साला” म्हणत इशारा दिला होता.

“रवी राणा कायर आहे, आजी आमची फायर आहे”

चंद्रभागा आजींचा जोश पाहून आसपासच्या शिवसेना कार्यकर्त्यांनी देखील “रवी राणा कायर आहे, आजी आमची फायर आहे” अशी घोषणाबाजी केली होती. “रवी राणा दोन दिवस मातोश्रीवर आमच्या वहिनींना आणि सगळ्यांना त्रास देत आहे. त्यामुळे आम्ही शिवसेना कार्यकर्ते त्याला इंगा दाखवणार आहोत. तुझी हिंमत कशी झाली?”, असा सज्जड सवालच आजीबाईंनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला होता.

हेही वाचा : “झुकेगा नहीं साला”, ९२ वर्षांच्या आजीबाईंचा राणा दांपत्याला ‘पुष्पा’स्टाईल इशारा; मुख्यमंत्र्यांनी फोन करून घेतलं बोलावून!

“आमच्या साहेबांवर आलेलं संकट आम्ही दूर करणार नाही का? साहेबांसाठी आम्ही झटणार. तिला (नवनीत राणा) वाटतं दोघंजण येऊ आणि गुपचूप जाऊ, पण आम्ही भिणार नाही. तू आमच्या समोर ये. शिवसेनेसाठी आम्ही रक्ताचं पाणी केलंय, अजून हरणार नाही. तुम्ही मातोश्रीवर येऊन दाखवाच”, असं आव्हान आजीबाईंनी दिलं होतं.

उद्धव ठाकरेंचा आजीबाईंना फोन!

दरम्यान, चंद्रभागा आजींचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीच मातोश्रीमधून त्यांना फोन करून बोलावून घेतलं होतं. यावेळी फोनवर देखील चंद्रभागा आजींनी उद्धव ठाकरेंना तुमच्यासाठी आम्ही इथं बसलो असल्याचं सांगितलं होतं. “उद्धव ठाकरेंनी सांगितलं की काळजी घ्या. फार वेळ बसू नका. चहापाणी झालं. मी म्हटलं साहेब जय महाराष्ट्र, तुमच्यासाठी आम्ही इथे बंगल्याच्या बाहेर उभे आहोत. ती कशी येतेय ते बघू आम्ही. मी इथेच बसणार. मातोश्रीवर तुम्हाला कुणी काही बोललं तर आम्ही गप्प बसणार नाही”, असं उद्धव ठाकरेंना फोनवर सांगितल्याचं चंद्रभागा आजीनं सांगितलं होतं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm uddhav thackeray meet 92 year old grandmother shivsena worker with family in mumbai pbs