मुंबई किनारी रस्ता प्रकल्पातील प्रियदर्शनी पार्क ते गिरगांव चौपाटी या पहिल्या बोगद्याचे खोदकाम पूर्ण झाले. भारतातील सर्वात मोठ्या ‘मावळा’ या टिबीएम संयंत्राच्या सहाय्याने आज हे काम पूर्ण झाले. या यंत्राने २.०७० किलोमीटर लांबीच्या पहिल्या बोगद्याचे काम पूर्णत्वाला नेले. या बोगदा खणन कामाचा ‘ब्रेक थ्रू’ सोमवारी (१० जानेवारी) गिरगाव चौपाटी येथे पार पडला. या कार्यक्रमास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. त्यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी या कामाबाबत शाबासकी दिलीय.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, “शाब्बास, उत्तम काम करत आहात. “मावळा” या शब्दाला साजेसे काम हे यंत्र आणि यंत्र हाताळणारे माझे सहकारी करत आहेत. स्वप्नं प्रत्यक्षात आणणं कठीण असतं, पण मुंबईकरांचे हे स्वप्नं पूर्ण करण्याच्या ध्यासाने काम करणाऱ्या माझ्या टीमचा मला अभिमान आहे. या मावळ्याच्या कामाचा शुभारंभ केलेला दिवस आठवतो. तेव्हा आपण कामाचा टप्पा कधी आणि कोणत्या काळात पूर्ण करू हे सांगितले होते.”
“बोगद्याची दोन टोकं समुद्राखालून जोडण्याचं काम आव्हानात्मक होतं”
“मुंबईकरांच्या जीवनाला आणि मुंबईच्या वाहतूकीला गती देणारा हा प्रकल्प आहे. कोरोना काळात, उन वारा पावसाच्या काळातही प्रकल्पाचे काम अडले नाही, ते तितक्याच वेगाने सुरु राहिले. दोन टोक विशेषत: समुद्राखालून जोडायचे हे काम आव्हानात्मक होते,” असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी हे काम आपण शक्य करून दाखवल्याचं सांगत तमाम मुंबईकरांच्यावतीने धन्यवाद मानले.
“ठरलेल्या तारखेला सागरी किनारा मार्ग प्रकल्प पूर्ण होईल”
उद्धव ठाकरे म्हणाले, “१९९५ साली मुंबईत युती शासनाने ५५ उड्डाणपूल बांधले. आता ते देखील कमी पडू लागले आहेत. नंतर आपण कोस्टल रोडचे स्वप्न पाहिले. आपण केवळ रस्त्याचे काम करत नाही, तर आसपासच्या भागाचे सुशोभीकरणही करत आहोत. ठरलेल्या तारखेला सागरी किनारा मार्ग प्रकल्प पूर्ण होईल असा मी विश्वास देतो. शासन आवश्यक असलेले सर्व सहकार्य करेल याचे वचन देतो.”
“मुंबईकरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अहोरात्र झटत आहात”
“मुंबईकरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अहोरात्र झटत आहात तुम्हाला मी शुभेच्छा देतो. कोस्टल रोड तुमच्या मेहनत, चिकाटी आणि जिद्दीतून निश्चित कालावधी आधी पूर्ण होईल,” असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला.
“कठीण काम मावळ्याने पार पाडले, पहिले टनेल पूर्ण”
मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, “आज अतिशय आनंदाचा, अभिमानाचा दिवस आहे. कठीण काम मावळ्याने पार पाडले. पहिले टनेल पूर्ण झाले. इज ऑफ लिविंगवर फोकस करून मुंबई उपनगरात विविध कामे सुरू आहेत. मुंबईला पुढे नेण्याची ताकत या कामांमध्ये आहे. बीएमसी टीमचे अभिनंदन आणि सर्वांना शुभेच्छा. ऑन ग्राऊंड काम करणाऱ्या टीमलाही शुभेच्छा.”
“एक वर्षात बोगदा पूर्ण झाला”
आयुक्त इक्बालसिंह चहल यांनीही यावेळी आपलं मनोगत व्यक्त केलं. ते म्हणाले, “सुखाचा प्रवास मोकळा श्वास हे या प्रकल्पाचे ब्रीद आहे. एक वर्षात बोगदा पूर्ण झाला. ११ जानेवारी २०२१ रोजी कामास प्रारंभ झाला होता. हा एकप्रकारे विक्रम आहे. नियोजित तारखेपर्यंत हा बोगदा पूर्ण होईल असा विश्वास वाटतो.”
हेही वाचा : लोकसत्ता विश्लेषण : मुंबईत मालमत्ता कर माफीचा नक्की फायदा काय होणार?
कार्यक्रमास मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर, आयुक्त इक्बालसिंह चहल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्यासह पालिकेचे नगरसेवक, पालिकेचे अधिकारी ही दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.