मुख्यमंत्र्यांकडून अर्थसंकल्पाचे स्वागत
मुंबई : राज्यात वेगवेगळ्या विचारांच्या पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केले आहे, ते किती दिवस चालेल, अशी अनेकांना शंका होती, परंतु आता सरकारला शंभर दिवस पूर्ण झाले आहेत, अर्थसंकल्पही मांडला आहे, सरकार तीन पक्षांचे असले तरी, विचार एक आहे, तो म्हणजे महाराष्ट्राच्या विकासाचा, अशा शब्दात टीकेला उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या अर्थसंकल्पाचे समर्थन केले.
राज्यातील सर्व घटकांचा विचार करणारा आणि राज्याला प्रगतीच्या दिशेने नेणारा हा अर्थसंकल्प असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधी पक्षांनी अर्थसंकल्पावर केलेल्या टीकेचा समाचार घेतला.
मुख्यमंत्री म्हणाले की, हे सरकार जेव्हा अस्तित्वात आले, त्यावेळी अनेकांना आनंद झाला, तर काहींच्या भुवया उंचावल्या होत्या. हे सरकार किती दिवस, किती तास, किती मिनिटे चालेल, असा प्रश्न अनेकजणांना पडला होता. पण आज मला सांगायला समाधान आणि अभिमान वाटतो, की या सरकारने शंभर दिवस पूर्ण केले आहेत व राज्याचा अर्थ संकल्पही सादर केलेला आहे. तीन पक्षांनी एकत्र येऊन राज्याचा विकास या एकाच विचाराने अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यामुळे त्यांच्या मनातील चिंता, शंका दूर झाल्या असतील असा टोला त्यांनी विरोधी पक्षांना लगावला.