दोन लसमात्रा घेतलेल्यांना लाभ; उपाहारगृहे, मॉलबाबत लवकरच निर्णय
मुंबई : करोना रुग्णसंख्या घटल्याने र्निबध शिथिल करण्यासाठी जनमताचा दबाव आणि लशीच्या दोन मात्रा घेतलेल्यांना रेल्वे प्रवासाला मुभा देण्याबाबत विचार करण्याच्या उच्च न्यायालयाच्या सूचनेनंतर अखेर १५ ऑगस्टपासून सर्वसामान्यांना उपनगरी रेल्वेतून प्रवासास परवानगी देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी केली. मात्र, त्यासाठी दोन लसमात्रा घेऊन १४ दिवस पूर्ण झाल्याची अट आहे. उपाहारगृहे, धार्मिकस्थळे आणि मॉल्सबाबतही लवकरच निर्णय घेण्याचे संकेत समाजमाध्यमाद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी मुंबई महानगर प्रदेशातील लाखो नोकरदारांना दिलासा दिला. रेल्वेसेवा सुरू करण्याबाबत जनमताचा रेटा वाढला होता. रेल्वे सुरू करण्याबाबत सरकारने विचार करावा, अशी सूचना उच्च न्यायालयाने केली होती. या पाश्र्वभूमीवर स्वातंत्र्यादिनापासून सर्वसामान्यांना रेल्वेसेवेची मुभा मिळणार आहे. मुंबईतील १९ लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. रेल्वेसेवेसाठी राज्य सरकारच्या वतीने तयार करण्यात आलेल्या अॅपवर किं वा शहरातील महापालिकांच्या कार्यालयातून क्यूआर कोड मिळविणे आवश्यक असेल. अॅपवर लसीकरण पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. त्यानंतरच परवानगी पत्र मिळेल. क्यूआर कोड दाखवल्यावरच रेल्वे तिकीट खिडकीवर मासिक पास अथवा दैनंदिन तिकीट मिळू शके ल. गेल्या एप्रिलपासून सर्वसामान्यांसाठी बंद असलेली रेल्वेसेवा जवळपास चार महिन्यांनी पुन्हा सुरू होत आहे.
गेल्या आठवडय़ापासून दुकानांच्या वेळा वाढविण्यात आल्या होत्या. परंतु, उपाहारगृहांना सायंकाळी ४ पर्यंतच परवानगी आहे. उपाहारगृहांची वेळ वाढविणे, धार्मिकस्थळे आणि मॉल्स सुरू करण्याबाबत सोमवारी वैद्यकीय तज्ज्ञांच्या कृतिदलाच्या बैठकीत चर्चा के ली जाईल. टप्प्याटप्प्याने ८ ते १० दिवसांत हे सारे सुरू करण्याचे संके त मुख्यमंत्र्यांनी दिले. व्यापारी, उपाहारगृहांचे चालक आदींनी संयम सोडू नये, असे आवाहन त्यांनी के ले. तसेच काही उचापतखोर लोक व्यापारी व अन्य घटकांना चिथावत आहेत. करोनाचे संकट अद्याप संपलेले नसल्याने खबरदारी घ्यावी लागत आहे. अशा उचापतखोरांच्या दबावाला बळी पडू नका, असे आवाहन करीत मुख्यमंत्र्यांनी भाजपला टोला लगावला.
कोकण व पश्चिम महाराष्ट्र चिंताजनक
अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसलेल्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्य़ांमध्ये करोना रुग्णसंख्या अद्यापही कमी झालेली नाही. दैनंदिन रुग्णसंख्या या जिल्ह्य़ांमध्ये जास्त आहे. याशिवाय पुणे, नगर, बीड, सोलापूरमध्येही परिस्थिती चिंता करण्यासारखी आहे. या जिल्ह्य़ांमध्ये र्निबध लगेच शिथिल के ले जाणार नाहीत, असे ठाकरे यांनी स्पष्ट के ले. राज्यात पुन्हा रुग्णसंख्या वाढल्यास र्निबध लागू करावे लागतील, असा इशारा देत मुख्यमंत्र्यांनी सर्वानी खबरदारी घेण्याचे आवाहन के ले. के रळमध्ये रुग्ण वाढत आहेत. अमेरिका, तसेच अन्य देशांमध्येही दैनंदिन रुग्णसंख्या वाढतच आहे. या पाश्र्वभूमीवर आपल्याला खबरदारी घ्यावी लागेल.
राज्यात आतापर्यंत ४ कोटी ६३ लाख ७६ हजार लसमात्रा देण्यात आल्या. यामध्ये पहिली मात्रा घेतलेल्या नागरिकांची संख्या ३ कोटी ४५ लाख ३० हजार ७१९ तर दोन्ही मात्रा घेतलेल्या नागरिकांची संख्या १ कोटी १८ लाख ४६ हजार १०७ आहे. लसीकरण वाढत असले तरी एका टप्यापर्यंत लसीकरण होत नाही तोवर र्निबध पाळावेच लागतील, असेही ठाकरे यांनी स्पष्ट के ले. त्यासाठी करोनामुक्त गावासारखी संकल्पना राबविली जात असून अनेकांनी या दिशेने योग्य पाऊले टाकायला सुरुवातही केली आहे. उद्योजक, कंपन्यांनी आपल्या कामाच्या वेळा बदलून शिफ्टमध्ये कामगारांना बोलवावे, शक्य असलेल्या कंपन्यांनी त्यांच्या कामगारांची राहण्याची सोय त्यांच्या संकु लात करावी, अशी विनंतीही त्यांनी यावेळी के ली.
तिसऱ्या लाटेसाठी सज्जता
करोनाच्या पहिल्या लाटेत २० लाख, दुसऱ्या लाटेत ४० लाख लोक बाधित झाले असून, तिसऱ्या लाटेत ६० लाख लोक बाधित होण्याची भीती वर्तवण्यात येत असल्याचे नमूद करताना मुख्यमंत्र्यांनी त्यादृष्टीने सरकार सज्ज असल्याचे सांगितले. या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी चाचणी प्रयोगशाळांची संख्या आता ६०० वर गेल्याचे, विलगीकरण रुग्णशय्यांची संख्या ४.५ लाखांहून अधिक केल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यात अतिदक्षता विभागाच्या ३४ हजार ५०७ तर प्राणवायूच्या १ लाख १० हजार ६८३ खाटा उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिली. आजही प्रतिदिन १३०० मेट्रीक टन प्राणवायू निर्मितीची क्षमता असून गेल्यावेळी दुसऱ्या लाटेत १७००ते १८०० मेट्रीक टन प्राणवायू दररोज लागला. प्राणवायू स्वावलंबन धोरण राबवित असलो तरी तातडीने प्राणवायू निर्मितीला मर्यादा आहेत.
आपत्तीग्रस्तांना भरीव मदत
जुलै महिन्यात रायगड, रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर मध्ये अतिवृष्टी आणि महापूराचा तडाखा बसला. विक्रोळी, चेंबूर येथे दरडी कोसळल्या. दरड कोसळून तळीये गावात अनेकांनी जीव गमावले असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, या घटना दुर्देवी आहेत. परंतु या सर्व आपत्तीग्रस्तांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. सरकारने निकषांपलिकडे जाऊन अधिकची मदत के ली असून त्यासाठी ११ हजार ५०० कोटी रूपयांचे पॅके ज जाहीर करण्यात आले आहे. मदतवाटप सुरू झाली असून दरडप्रवण, पूरग्रस्त भागातील नागरिकांसाठी र्सवकष कायमस्वरूपी धोरण आखणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
दरडींवर कायमस्वरुपी तोडगा
दरडी कोसळण्याचे प्रकार चिंताजनक आहेत. दोन दिवसांत महिनाभराचा पाऊस होऊ लागला आहे. दरडी कोसळण्याचे प्रकार थांबविण्यासाठी कायमस्वरुपी तोडगा काढावा लागेल. या दृष्टीने सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. या आठवडय़ात या संदर्भातील अहवाल प्राप्त झाल्यावर कोणते उपाय योजता येतील याचा विचार के ला जाईल, असे ठाकरे यांनी सांगितले.
५० टक्के आरक्षणाची मर्यादा उठवावी
मराठा समाजास आरक्षणाचा लाभ मिळण्यासाठी ५० टक्कय़ांची आरक्षण मर्यादा शिथील करण्याची पंतप्रधानांना विनंती केली असून याबाबत अद्याप केंद्राची भूमिका स्पष्ट नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. केंद्राने १०२ व्या घटनादुरुस्तीबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी दिली परंतु आरक्षणाची ५० टक्कय़ांची मर्यादा जोपर्यंत हटत नाही तोपर्यंत या प्रस्तावाचा उपयोग नसल्याने ही मर्यादा उठवावी व राज्याला आरक्षणाचे अधिकार द्यावेत अशी राज्याची मागणी पंतप्रधानांकडे केल्याचे त्यांनी सांगितले. इतर मागास प्रवर्ग (ओबीसी)च्या राजकीय आरक्षणासाठी केंद्राकडे इंपेरिकल डेटाची मागणी केली असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
भाजपकडून स्वागत
करोना लशीच्या दोन मात्रा घेतलेल्यांना उपनगरी रेल्वेप्रवासाची परवानगी देण्याच्या निर्णयाचे भाजपने स्वागत केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उशिरा का होईना, शहाणपणाचा निर्णय घेतला असल्याची प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. जनमताचा रेटा, भाजपचे आंदोलन व उच्च न्यायालयाने फटकारल्याने सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे पाटील म्हणाले.
निर्बंधांतून पुणेकरांनाही दिलासा
पुणे : करोना संसर्ग नियंत्रणात असल्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांना निर्बंबधांतून मोठा दिलासा देण्याचा निर्णय पालकमंत्री अजित पवार यांनी रविवारी घेतला. त्यानुसार सर्व प्रकारची दुकाने आठवडय़ातील सर्व दिवस (एक सुटी वगळता) रात्री ८ पर्यंत, तर उपाहारगृहे, मद्यालये रात्री १० पर्यंत खुली ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. मॉलही रात्री ८ पर्यंत खुले ठेवता येतील. लशींच्या दोन मात्रा घेतलेल्यांनाच मॉलमध्ये प्रवेश देण्यात येईल. सोमवारपासून
(९ ऑगस्ट) या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. निर्बंध शिथिल करण्यासाठी पुण्यातील व्यापाऱ्यांनी गेल्या काही दिवसांपासून केलेल्या आंदोलनाचे हे यश मानले जाते.
ठाण्यातील आंदोलन स्थगित : वेळमर्यादा वाढवून न दिल्याने सोमवारपासून संपूर्ण जिल्ह्यत घरपोच सुविधेसह उपाहारगृहे बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय व्यावसायिकांनी घेतला होता. मात्ऱ, मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर जिल्ह्यतील संघटनांनी बंद आंदोलनाला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. मात्र, चार दिवसांत उपाहारगृहांची वेळमर्यादा न वाढविल्यास आम्ही पुढचे पाऊल उचलू, असा इशारा संघटनेने दिला आहे.
करोनाचे संकट संपलेले नाही. मात्र, टप्प्याटप्प्याने र्निबध शिथिल करण्यात येत आहेत. कृतिदलाच्या सोमवारच्या बैठकीत उपाहारगृहे, मॉलबाबतही विचार केला जाईल. याबाबत योग्य वेळी निर्णय घेण्यात येईल. उपाहारगृह व्यावसायिक, व्यापाऱ्यांनी संयम बाळगावा. – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री