लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई: करोना व लॉकडाउनच्या काळापासून अपंग व्यक्तींना कामावर येण्यास सरकारने सूट दिलेली असतानाही सेंट जॉर्ज रुग्णालयात टेलिफोन ऑपरेटर म्हणून काम करणाऱ्या आणि अंध असलेल्या राजू चव्हाण याने एकही सुट्टी न घेता रोज निष्ठेने काम केले. याची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज थेट सेंट जॉर्ज रुग्णालयात फोन करून राजू चे कौतुक केले.

सेंट जॉर्ज रुग्णालयात टेलिफोन ऑपरेटर म्हणून गेली अनेक वर्षे काम करत असलेल्या अंध असलेल्या राजू चव्हाण याने करोना काळात म्हणजे गेल्या तीन महिन्यात साप्ताहिक सुट्टी वगळता एकही दिवस रजा घेतली नाही. ट्रेन बंद व अत्यावश्यक सेवेसाठीची निवडक बस असतानाही जोगेश्वरीहून न चुकता राजू सेंट जॉर्ज रुग्णालयात कामाला येत आहे. या काळात टेलिफोन ऑपरेटर म्हणून रुग्णांच्या शेकडो नातेवाईकांचे फोन घेऊन त्यांना दिलासा देणे तसेच रुग्णांना रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यापासून आवश्यक ती सर्व माहिती देण्याचे काम राजूने केले. या विषयावर ‘लोकसत्ता डॉट कॉम’ मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: आज राजूला फोन करून त्याचे कौतुक केले. तुम्ही ‘खरे करोना योद्धा’ आहात असे मुख्यमंत्री म्हणाले असे राजू यांनी सांगितले. माझा केवळ खारीचा वाटा असून आमचे डॉक्टर जे काम करतात ते खरे प्रेरणादायी असल्याचे आपण मुख्यमंत्र्यांना सांगितले. त्यांच्या फोनमुळे व केलेल्या कौतुकाने आपण भारावून गेल्याचे राजू चव्हाण म्हणाले.

त्याचप्रमाणे प्रधान सचिव विकास खारगे यांनीही राजूला फोन करून त्याचे कौतुक केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेला फोन हे रुग्णालयाचे कौतुक असल्याचे अधीक्षक डॉ. आकाश खोब्रागडे यांनी सांगितले.

 

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm uddhav thackerays phone to blind telephone operator raju chavan who works in saint george hospital scj