CNG-PNG Price Today: ऐन सणासुदीच्या तोंडावर सर्वसामान्यांना महागाईची झळ बसली आहे. सीएनजी आणि पीएनजी गॅसच्या किमतींमध्ये पुन्हा वाढ झाली आहे. सीएनजीच्या दरात प्रति किलो सहा रुपयांची तर घरगुती गॅसच्या किमतीमध्ये चार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू करण्यात आले आहेत. महानगर गॅस लिमिटेडने मुंबईत ही दरवाढ केली आहे.
कंपनीच्या मायलेजचा दावा करण्याच्या फंदात पडू नका! सीएनजी कार घेणे किती फायदेशीर आहे ‘हे’ जाणून घ्या
ऑगस्ट महिन्यात महानगर गॅस लिमिटेडकडून सीएनजीच्या दरात सहा रुपयांची कपात करण्यात आली होती. त्याचप्रमाणे सीएनजीचे दरही चार रुपयांनी कमी करण्यात आले होते. मात्र, आता या दरांमध्ये वाढ झाल्यानंतर सीएनजी वाहनधारकांना मोठा फटका बसला आहे. दरम्यान, येत्या काळात सीएनजीचे दर आठ ते १२ रुपयांनी वाढण्याची शक्यतादेखील वर्तवण्यात आली आहे. वाढीव दरांनुसार मुंबईत प्रति किलो सीएनजीसाठी ८६ रुपये मोजावे लागत आहेत. तर प्रति किलो पीएनजीसाठी ५२.५० रुपये आकारले जात आहेत.
१ ऑक्टोबरपासून नैसर्गिक वायूच्या आयात किंमतीत तब्बल ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्यांना सीएनजी आणि पीएनजीसाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत. पेट्रोल-डिझेलनंतर आता सीएनजीही शंभरी गाठण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.