सर्वसामान्य जनता महागाईमुळे त्रस्त झाली आहे. सध्या अन्नधान्यापासून ते भाजीपाल्यापर्यंत आणि पेट्रोल, डिझेलपर्यंत सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. असे असतानाच आता सीएनजीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना पुन्हा एकदा महागाईचा झटका बसला आहे. मुंबईत सीएनजी आणि पीएनजी गॅसची दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता मुंबईकरांना सीएनजी आणि पीएनजीसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.
मुंबईत महानगर गॅस लिमिटेडने ९ जुलैपासून मुंबईसह आसपासच्या परिसरात सीएनजी आणि घरगुती पीएनजीच्या किंमतीमध्ये मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सीएनजी आणि पीएनजीचे नवे दर ९ जुलैच्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत. दरम्यान, सीएनजी आणि पीएनजीच्या दरावाढीमुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री लागणार आहे.
हेही वाचा : मोनोरेलच्या प्रवासी संख्येत लक्षणीय वाढ; सायंकाळी सात वाजेपर्यंत १८ हजार प्रवाशांनी केला प्रवास
किती रुपयांनी दर वाढले?
सीएनजीच्या दरात दीड रुपयांची आणि पीएनजीचे दरामध्ये १ रुपयाची वाढ कऱण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांना आता एका किलोच्या सीएनजीसाठी ७५ रुपये द्यावे लगणार आहेत. तर पीएनजीच्या दरात १ रुपयाची वाढ झाल्यामुळे पीएनजीचा आधीच्या ४७ रुपयांचा दर आता ४८ रुपये होणार आहे.
दरम्यान, मुंबईमध्ये अनेक रिक्षा आणि टॅक्सी सीएनजीवर चालतात. मात्र, सीएनजीच्या दरात वाढ झाल्यामुळे आता मुंबईकरांचा प्रवास महागण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ झाल्यामुळे सर्वसामान्यांचं महिन्याचं बजेट कोलमडण्याची शक्यता आहे.