दिल्लीस्थित रणवीर सिंग यांच्या मुलाला- सतीश याला अभियांत्रिकीला प्रवेश घ्यायचा होता. त्यासाठीच्या प्रवेश परीक्षेची तयारी म्हणून सिंग यांनी ‘ब्रिलियंट’ क्लासमध्ये त्याचे नाव नोंदवले. कोचिंग क्लासला प्रवेश घेतल्यानंतर आणि त्याचे शुल्क भरल्यानंतर सतीश दोन दिवसच शिकवणीच्या वर्गाला बसला. त्याला तेथील शिकवण्याची पद्धत काही आवडली नाही. त्यामुळे हे वर्ग पुढे सुरू ठेवायचे नसल्याचे त्याने वडिलांना सांगितले. तसेच क्लासच्या प्रमुखांची भेट घेऊन त्याने त्यांनाही वर्ग पुढे सुरू ठेवण्यास इच्छुक नसल्याचे सांगितले व शिकवणी वर्गासाठी भरलेल्या शुल्काचा परतावा देण्याची विनंती केली. परताव्याची रक्कम परत केली जाईल, असे सुरुवातीला सांगणाऱ्या ‘ब्रिलियंट’ क्लासने विविध कारणे देत ती देण्यास विलंब केला. तरीही सतीशने शुल्क परताव्यासाठी तगादा सुरूच ठेवला. पण नंतर कोचिंग क्लासने परतावा मिळू शकणार नाही, असे सांगत हात वर केले.

या प्रकारानंतर सतीशच्या वडिलांनी जनकपुरी येथील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे ब्रिलियंट क्लासविरोधात तक्रार केली. क्लासचे प्रभारी काम पाहणाऱ्यांविरोधात ही तक्रार करण्यात आली. क्लासने या तक्रारीला उत्तर देताना सतीशने स्वत:हून शिकवणी बंद केल्याने त्याला परतावा देण्यास बांधील नाही, अशी भूमिका घेतली. सतीशने आगाऊ रक्कम म्हणून फक्त एक हजार रुपयेच भरले होते व उर्वरित रक्कम भरायची आहे, असा दावाही क्लासने ग्राहक मंचासमोर केला. ग्राहक मंचाने क्लासचे हे म्हणणे अयोग्य ठरवत सतीशला अभ्यासक्रम शुल्काची ९० टक्के रक्कम सव्याज परत करावी, असे आदेश ब्रिलियंट क्लासला दिले. तसेच क्लासच्या वर्तणुकीमुळे सतीशला झालेल्या मनस्तापाबद्दल नुकसान भरपाई म्हणून पाच हजार रुपये देण्याचे आदेश मंचाने दिले.

ग्राहक मंचाचा हा निर्णय न पटल्याने ब्रिलियंट क्लासने दिल्ली राज्य ग्राहक वाद निवारण आयोगाकडे धाव घेतली. सतीश याने एक हजार रुपयेच भरले होते, हा मुद्दा क्लासने पुन्हा लावून धरला. तसेच सतीश याने शिकवणी वर्गाना येणे बंद करण्याआधी आपल्या भावाला अपघात झाल्याचे कारण दिले होते, असा दावाही क्लासच्या वतीने करण्यात आला.

राज्य ग्राहक वाद निवारण आयोगाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकला. सतीशने केवळ एक हजारच भरले होते, हे सिद्ध करणारा एकही पुरावा क्लासने सादर केला नसल्याकडे बोट दाखवतानाच सतीशने शिकवणीसाठी भरलेल्या ४० हजार रुपयांच्या शुल्काच्या पावत्या सादर केल्या असल्याचे आयोगाने स्पष्ट केले. त्यामुळे क्लासचा बचाव खोटा असल्याचे ताशेरे आयोगाने ओढले. एवढेच नव्हे, तर शुल्काचा परतावा मिळवण्यासाठी सतीश आणि क्लासमध्ये जो काही पत्रव्यवहार झाला त्यावरून सतीश याला शिकवणी वर्गामधील शिकवण्याची पद्धत निकृष्ट दर्जाची असल्याचे कळले होते आणि म्हणूनच त्याने हे वर्ग पुढे सुरू न ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट होत असल्याचेही निरीक्षण आयोगाने नोंदवले. सतीश याने भावाला अपघात झाल्याच्या कारणास्तव स्वत: शिकवणी वर्गाना येणे बंद केले हा ब्रिलियंट क्लासचा दावाही मान्य केला जाऊ  शकत नसल्याचे नमूद करत आयोगाने क्लासचा हा दावासुद्धा खोटा ठरवला.

१९ डिसेंबर रोजी राज्य आयोगाच्या न्यायमूर्ती वीणा बिरबल आणि सदस्या सलमा नूर यांच्या खंडपीठाने याबाबत निकाल देताना सतीश याने क्लासकडे एकूण शुल्कापैकी ४० हजार रुपये जमा केल्याची बाब मान्य केली. तसेच शिकवणी वर्गातील शिकवण्याची पद्धत ही निकृष्ट असल्याचे विद्यार्थ्यांला आढळले आणि त्याप्रति तो असमाधानी असेल तर त्यानंतरही त्याला हे शिकवणी वर्ग पुढे कायम ठेवण्याची सक्ती केली जाऊ  शकत नाही. तसेच विद्यार्थ्यांने जे काही शुल्क भरले आहे त्याचा परतावा देण्यास संबंधित क्लास बांधील असून क्लासने हे शुल्क देण्यास टाळाटाळ केली वा ते दिले नाही, तर तसे करणे हेसुद्धा एक प्रकारची निकृष्ट सेवाच असल्याचा निर्वाळाही आयोगाने दिला. त्याचप्रमाणे जनकपुरी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने सतीश याच्या बाजूने दिलेला निर्णय योग्य ठरवत त्यावर शिक्कामोर्तब केले.

Story img Loader