किरीट सोमय्या यांचा आरोप
कोळसा घोटाळ्यात राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांचेही हात काळे झाले असून त्यांचेही या घोटाळ्यातील कनेक्शन तपासा, अशी मागणी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आज केली. या घोटाळ्यात महाराष्ट्रातील दोन मंत्रीही गुंतले असून यातील एक मंत्री केंद्रीय मंत्रिमंडळात असल्याचेही त्यांनी सांगितले. कोळसा घोटाळ्यात दोशी आढळल्यास राजीनामा फेकून देण्याची भाषा करणाऱ्या शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांना आता मुख्यमंत्री व राज्यपालांनी मंत्रिमंडळातून फेकून द्यावे, अशीही मागणी सोमय्या यांनी केली. त्याचप्रमाणे काँग्रेस सरकार सीबीआयवर दबाव आणत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
एका लाख कोटीहून अधिक असलेल्या या कोळसा घोटाळ्यात महाराष्ट्रातील सहा मंत्री व नेत्यांचे हात काळे झाले असल्याचे सांगून, वेगवेगळ्या नेत्यांशी संबंधित १६८ कंपन्यांची यादीच आज भाजप प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत सोमय्या यांनी सादर केली. किरीट सोमय्या यांनी आज सीबीआय कार्यालयात जाऊन तब्बल बारा हजार पानांची या घोटाळ्यातील कागदपत्रे सीबीआयला सादर केली. तसेच ही कागदपत्रे दिल्लीतील या घोटाळ्याचा तपास करणाऱ्या सीबीआयच्या महासंचालकांना देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कोळसा घोटाळ्यात भुजबळ यांचेही हात काळे झाले असून आर्मस्ट्राँग एनर्जी या कंपनीच्या माध्यमातून शंभर कोटी रुपये काळ्याचे पांढरे केले. नाशिकमध्ये ऊर्जानिर्मिती करण्याच्या बाता भुजबळ कंपनीकडून मारल्या गेल्या, मात्र हरित पट्टय़ामध्ये इंडोनेशियातून कोळसा कसा आणणार, असा सवालही सोमय्या यांनी केला. या घोटाळ्यातील बडे प्रस्थ असलेल्या जैस्वाल ग्रुपशी तुमचे काय संबंध आहेत तेही स्पष्ट करा, असे आव्हान सोमय्या यांनी दिले.
अकोला, वारंग आणि हिंगोली या रस्त्याचे १२०० कोटी रुपयांचे कंत्राट अभिजित जैस्वाल यांना दिले असून त्या बदल्यात कोळशाची दलाली मिळाली का, याचीही चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. भुजबळ कंपनीची आर्मस्ट्राँग एनर्जी ही कंपनी बंद असतानाही दहा रुपयांचे कंपनीचे शेअर दहा हजार रुपयांना कोणी विकत घेतले, असा सवाल करून भुजबळ यांच्यावर एफआयआर दाखल झाल्यानंतर त्यांच्याही राजीनाम्याची मागणी करू, असे ते म्हणाले.
राजेंद्र दर्डा व त्यांच्या तिन्ही मुलांशी संबंधित कंपन्यांचे दहा रुपयांचे शेअर ८८८५ रुपयांना कोणी घेतले याचे उत्तर द्या, अशी मागणी करून “असेरा बांका पॉवर प्रायव्हेट लि.”चे अवघे दहा टक्के शेअर विकून ११३ कोटी रुपये कमाविल्याचेही सांगितले. राजेंद्र दर्डा यांना आजपर्यंत अटक का झाली नाही, असा सवाल करून पंतप्रधान तसेच सोनिया गांधी यांना या घोटाळ्याची पूर्ण कल्पना असून सीबीआयवर केंद्र शासनाकडून दबाव आणला जात असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. कोळसामंत्री श्रीप्रकाश जैस्वाल, सुबोधकांत सहाय आणि शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा व मित्र परिवार कोळशाच्या दलालीत गळ्यापर्यंत अडकले असून १४२ खाणींचे परवाने रद्द केल्यास दलाली परत करावी लागेल या भीतीपोटी कोळसा खाणींचे परवाने रद्द केले जात नसल्याचे सोमय्या म्हणाले. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा