भारताच्या हद्दीमध्ये शिरण्याचा प्रयत्न करणारे एक रशियन जहाज तटरक्षक दलाने मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ताब्यात घेतले. मुंबईपासून ११० सागरी मैल अंतरावर हे जहाज होते.‘एम व्ही सेवस्टोपोल’ हे रशियन जहाज भारतीय सागरी हद्दीमध्ये प्रवेश करण्याच्या प्रयत्नात असताना ते ताब्यात घेण्यात आले. या जहाजावरील दळणवळण यंत्रणा आणि लाईट बंद करण्यात आले होते. त्यामुळे रात्रीच्या अंधारात त्याचा थांगपत्ता लागत नव्हता. डॉनिअर एअरक्राफ्टच्या सहाय्याने हे जहाज मुंबईजवळ समुद्रात असल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर या जहाजाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. परंतु जहाजावरील कर्मचारी संपर्क साधत नव्हते. अखेर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आल्यानंतर कर्मचाऱ्यांकडून प्रतिसाद मिळाला आणि जहाजावरील लाईटही लावण्यात आले. या जहाजाबाबत व्यावसायिक वाद मद्रास उच्च न्यायालयात असून न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार हे जहाज ताब्यात घेण्यात आल्याचे तटरक्षक दलाच्या सूत्रांनी सांगितले.

Story img Loader